नगर – मोकाट कुत्र्यांनी अधिच नगरकर वैतागले असताना आज तर या कुत्र्यांनी हद्दच केली. अर्धवट जळालेला मृतदेह मोकाट कुत्र्यांनी चितेतून बाहेर काढत बऱ्याच अंतरावर ओढत नेल्याचा धक्कादायक प्रकार नालेगाव येथील अमरधाम स्मशानभूमीत सोमवारी सकाळी उघडकीस आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. परिसरातील काही तरुणांनी पुन्हा या अर्धवट जळालेला मृतदेहाचा अंत्यविधी केला.
अमरधाम स्मशानभूमीत रविवारी दिवसभरात सुमारे 13 ते 14 अंत्यविधी झाले. दहन ओट्यांची संख्या कमी असल्याने काही अंत्यविधी ओट्याच्या खाली करण्यात आले होते. रात्री उशिरा ही एक अंत्यविधी ओट्याच्या खालीच करण्यात आला होता. सकाळी काही नागरिक दशक्रिया विधी निमित्त अमरधाममध्ये आले असता त्यांना एक अर्धवट जळालेला मृतदेह मोकाट कुत्रे ओढत नेत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण पसरले होते.
काहींनी महापालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच नगरसेवकांना फोन करुन याबाबतची माहिती दिली. काहींनी पोलिसांनाही कळविले. याबाबतची माहिती समजताच नवग्रह मित्र मंडळाचे अमोल बनकर व कार्यकर्ते त्या ठिकाणी आले.त्यांनी हा प्रकार पाहिला. अर्धवट जळालेला मृतदेह हा भटक्या कुत्र्यांनी चितेतून बाहेर काढल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर बनकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अर्धवट जळालेला मृतदेह पुन्हा चितेवर नेवून विधीवत अंत्यविधी केला.
या घटनेमुळे अमरधाममधील सुविधा व सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एखाद्या मृतदेहाची विटंबना ही संतापजनक बाब असून अमरधाम स्मशानभूमीची संरक्षक भिंत ठिकठिकाणी ढासळलेली असल्याने मोकाट कुत्रे व जनावरांचा या ठिकाणी नेहमीच वावर असतो. त्यातूनच अशा घटना होत असतात. त्यामुळे याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी यावेळी अजय चितळे यांनी केली.