कर्जत – संपूर्ण कर्जत तालुक्याचे लक्ष लागून असलेला आणि अतिशय जिव्हाळ्याचा विषय असलेला कर्जत बस डेपोचा प्रश्न अखेर आमदार रोहित पवार यांनी मार्गी लावला आहे. तब्बल तीस वर्षांपासून रेंगाळत पडलेल्या या प्रश्नावर आमदार रोहित पवार यांनी मंजुरी मिळवून दिली आहे.
कर्जतला बस डेपो व्हावा यासाठी आजपर्यंत अनेक आंदोलने झाली. मात्र डेपोच्या नावाखाली केवळ बसस्थानकावरच कर्जतकरांना समाधान मानावे लागले. तत्कालीन पालकमंत्र्यांनी दोन वेळा या कर्जतच्या बस स्थानकात बाहेरील डेपोच्या बस उभा करून त्याचे फोटोसेशन केले. मात्र प्रत्यक्षात दोन दिवसही या बससेवेचा लाभ कर्जतकरांना घेता आला नाही.
तालुक्यासाठी बस डेपोचा प्रश्न महत्वाचा असताना केवळ आश्वासने देऊन जनतेचे समाधान करण्यात आले. संपुर्ण तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणासाठी कर्जत येथे येत असतात.शासकीय कामांसाठी देखील अनेक अबालवृध्द कर्जत येथे येत असतात.मात्र अपुऱ्या बससुविधेचा त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.त्यांची रोज होणारी ससेहोलपट थांबवण्यासाठी मतदारसंघातील लोकांची मागणी लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी डेपोची मंजुरी मिळवून दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब आणि तेथील अधिकाऱ्यांच्या मदतीने हा प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य लाभले आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांच्या कल्पनेत असलेला कर्जत-जामखेड मतदारसंघ विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र प्रत्येकालाच अनुभवास मिळत आहे.
तीस वर्षांपासून डेपोचा प्रश्न प्रलंबित होता. या डेपोसाठी मतदार संघातून वेळोवेळी मागणी करण्यात आली. बस डेपोचा प्रश्न मी मार्गी लावणारच हा जनतेला दिलेला शब्द खरा करून दाखवला आहे. जनतेला दिलेला शब्द मी पाळला आहे.
आ. रोहित पवार आमदार, कर्जत जामखेड