जामखेड – कर्जत-जामखेडमधील मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्याच्या दृष्टीने आमदार रोहित पवार यांनी ठोस पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थे’ची स्थापना केली आहे.
या संस्थेच्या माध्यमातून नागरिक, स्वयंसेवक, राज्य सरकार व कंपनी सीएसआरच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबरोबरच शिक्षण, आरोग्य, जलसंधारण, महिला सक्षमीकरण व पर्यटन यांसारख्या विषयांवर भर देऊन मतदारसंघाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जाईल. या माध्यमातून कर्जत जामखेड एक ‘ब्रॅंड’ करण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी दिली.
पर्यटनाला चालना
यावेळी रोहित पवार म्हणाले, ‘एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून जेव्हा आम्ही अभ्यास केला तेव्हा आमच्या असे लक्षात आले की, या भागातील नागरिक, सरकार व कंपन्यांचे सीएसआर यांच्या माध्यमातून विकासाला गती देता येऊ शकते. हे करीत असताना देशभरातील मोठ्या कंपन्या, सामाजिक संस्था, सीएसआर यांना एकत्रित घेत काम करू शकू. सर्वांत पहिल्यांदा आम्ही पर्यटनावरील काम सुरू करीत आहोत. याद्वारे पर्यटनाला चालना दिल्यास स्थानिक युवक, महिला यांच्या विकासाला गती मिळू शकेल.”
याच उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हडपसर येथील लक्ष्मी लॉन्स येथे दि. १५ फेब्रुवारी रोजी होणा-या भव्य समारंभात करण्यात येईल. यावेळी पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्यासह पर्यटन विभागाच्या सचिव वलसा नायर सिंग, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, उद्योजिका दिपशिखा देशमुख व अभिनेते मिलिंद गुणाजी आदी मान्यवर उपस्थित असतील.’
यु-ट्यूबवर झळकणार वेब सिरिस
मतदारसंघात पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जातील. या अंतर्गतच जागरूक स्वयंसेवक, राज्य सरकार व कंपनी सीएसआरच्या माध्यमातून कामाला सुरुवात होईल. ज्यामध्ये सुरुवातीला कर्जत जामखेड मतदारसंघातील २२ पर्यटन स्थळांवरील ६ एपिसोड असणारी एक वेबसिरीज तयार करण्यात आली आहे. हे सर्व एपिसोड कर्जत जामखेड संबंधित ‘यु ट्युब’ चॅनेलवर दर आठवड्याला एक अशा प्रकारे उपलब्ध होतील.
याबरोबरच सुरू करण्यात येत असलेल्या संकेतस्थळावर कर्जत जामखेडला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने जिल्ह्याचे महत्त्व, वैशिष्ट्ये, चित्रीकरण करायचे असल्यास उपलब्ध होऊ शकणा-या बाबी (लोकेशन्सच्या माहितीबरोबर, राहणे, खाणे आदी सोयी) यांची माहिती मिळू शकणार आहे. इतकेच नाही तर चित्रीकरणासाठी आवश्यक सर्व परवानग्या देखील याच संकेतस्थळावर उपलब्ध होऊ शकतील.
दुसरीकडे मतदारसंघातील पाणी, शिक्षण, आरोग्याच्या सोयी-सुविधा आणि महिला सक्षमीकरण आदी मुद्द्यांवर काम करण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून वरील विषयांशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू. या अंतर्गत कोणत्याही स्वरूपाची आवश्यक मदत देण्याचा आमचा प्रयत्न असेल. या द्वारे मदतीची अपेक्षा असलेले व मदत करू इच्छिणारे एकत्र येऊन आपल्या गावासाठी भरीव काम करतील, असा आमचा विश्वास आहे.
लोगो केला तयार
विशेष म्हणजे, अशा पद्धतीने एखादा जिल्हा ब्रॅंड म्हणून घोषित करण्याचा हा भारतातील पहिलाच प्रयत्न असणार आहे. यासाठी आपण कर्जत-जामखेडचा विशेष लोगो देखील डिझाईन केला आहे.
या संकल्पनेविषयी रोहित पवार म्हणाले की, ‘एखादी सामाजिक संस्था समाजात काय बदल करू शकते, हे मी बारामतीमधील ‘ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’ अर्थात एडीटीच्या माध्यमातून जवळून पाहिले. पद्मविभूषण शरद पवार, आजोबा पद्मश्री अप्पासाहेब पवार, वडिल राजेंद्र पवार, आई सुनंदा पवार, ट्रस्टचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी यांनी या संस्थेमार्फत शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली. यातूनच कर्जत-जामखेड या माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.’ यावेळी या उपक्रमाच्या पर्यटनविषयक समन्वयक देवयानी पवार देखील उपस्थित होत्या.