युवकास जन्मठेप : अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल
पुणे – रंगकामाचे पैसे न दिल्याने डोक्यात फरशी मारून खून करणाऱ्याला जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
राहुल ऊर्फ उद्दल जगतबली सिंग (वय 24, रा. आश्रफनगर, कोंढवा) असे जन्मठेप झालेल्याचे नाव आहे. त्याला अविनाश ऊर्फ शिवा मधुकर जाधव (वय 29, रा. कोंढवा बुद्रुक) यांच्या खून प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. याबाबत अविनाश यांची पत्नी आशा (वय 27) यांनी कोंढवा पोलिसांत फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी काम पाहिले. त्यांनी 8 साक्षीदार तपासले. ही घटना 19 एप्रिल 2015 राजी कोंढवा, आश्रपनगर येथे घडली.
अविनाश पेंटिंगची कामे घेत असत. ती इतरांना कामाला लावून करवून घेत असत. राहुल याच्या मामाचे पेंटिंगचे पैसे राहिले होते. या कारणावरून त्याने अविनाश यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर डोक्यात फरशी मारून जबर जखमी केले. रक्तस्राव होत असल्याने पोलीस रुग्णवाहिकेतून अविनाश यांना ससुन रुग्णालय येथे घेऊन गेले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, त्याला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी ऍड. सुनील मोरे यांनी केली.