नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत अनेक कार्यक्रमात 2700 भेटवस्तू मिळाल्या आहेत. या वस्तूंचा आता सरकारने लिलाव सुरु केला आहे. 14 सप्टेंबरपासून हा ऑनलाइन लिलाव सुरु झाला आहे. पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तू खरेदी करण्यासाठी या लिलावात तब्बल 1-1 कोटींची बोली लावण्यात येत आहेत. ज्यात एक चांदीचा कळस आणि फोटो स्टॅंडचा सहभाग आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटवस्तू म्हणून एक चांदीचा कळस दिला होता. याच कळसासाठी आता तब्बल 1 कोटीची बोली लागली आहे. ज्याची बेस प्राइज (मूळ किंमत) ही फक्त 18,000 रुपये एवढी होती. या चांदीच्या कळसाशिवाय आणखी एक वस्तू आहे ज्याची विक्री देखील तब्बल 1 कोटीमध्ये झाली आहे. ती वस्तू म्हणजे पंतप्रधान मोदींचा एक फोटो स्टॅंड. या फोटो स्टॅंडमध्ये गुजरातीत पंतप्रधान मोदींचा संदेश लिहण्यात आला आहे. या स्टॅंडची खरेदी तब्बल 1 कोटी रुपयांमध्ये करण्यात आली आहे. पण त्याची मूळ किंमत किती होती हे समजल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. कारण की, या स्टॅंडची मूळ किंमत ही फक्त 500 रुपये एवढीच होती.