नवी दिल्ली – संसदेचे हिवाळी अधिवेशन ( Hiwali adhiweshan ) संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. यात मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान ( Shivrajsingh chauhan ) यांच्यासह महाराष्ट्रातून खासदार राहुल शेवाळे आणि प्रफुल्ल पटेल यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. चौहान यांना कृषी मंत्रालयाचा पदभार सोपविला जाणार असल्याची चर्चा आहे. ( Bjp )
भाजपशासित राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला आहे. आता संसदेचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा संसदेच्या आवारात सुरू झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची निवड मध्यप्रदेश विधानसभेच्या अध्यक्षपदी झाली आहे. यामुळे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना कृषी मंत्रालयाची जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांच्या मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार खूप दिवसांपासून प्रलंबित आहे. आता संसदेचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तार होवू शकतो असे समजते. भारतीय जनता पक्षाने 2024 मधील लोकसभेची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांना आकर्षित करणे हा त्यामागचा हेतू आहे.
अशात, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर 2024 मधील लोकसभेची निवडणूक डोळ्यापुढे ठेवूनच नेत्यांना संधी दिली जाणार आहे. यात अनेकांची खुर्ची जाण्याची शक्यता आहे तर अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. या विस्तारात निवडणुका लक्षात घेता तरूण, तडफदार आणि तेजतर्रार खासदारांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार असल्याचे समजते. निवडणुकीमुळे भाजप संघटना सुध्दा बळकट करायची आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्तारात ज्यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे त्यात शिवराजसिंग चौहान आणि माजी केंद्रीय मंत्री स्व. रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान यांचा समावेश आहे. याशिवाय, महाराष्ट्रातून दोन नेत्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेतून दोन आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉग्रेसमधून एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्र्याचा समावेश आहे.लोकसभेतील शिवसेनेचे नेते आणि दक्षिण मुंबईचे खासदार राहुल शेवाळे आणि बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसमधील ज्या नेत्याचे नाव चर्चेत आहे ते म्हणजे माजी नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे.
राजकीय विश्लेषकांनुसार, पंजाब, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र किंवा दक्षिण भारतातील काही मोठ्या आणि मजबूत नावांचा मोदी मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो. कॅबिनेट मंत्री भूपेंद्र यादव यांचे खाते बदलले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय पंजाबला साधण्यासाठी माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते. उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांच्याही नावाची चर्चा आहे.