मंचर -करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी केली असली तरी आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी खुर्द परिसरात सुमारे 900 जणांच्या हाताला शिक्के मारले असतानाही त्यातील काही तरुण सर्रास गावात फिरत आहेत. याबरोबरच मोटारसायकलींची वर्दळही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पोलिसांनी अशा विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अवसरी खुर्द येथील मुख्य बाजारपेठ रस्त्यावरून मोटारसायकलींची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. सायंकाळच्या वेळी खालची वेस परिसरात काही तरुण घोळक्यांनी बसलेले असतात. ग्रामपंचायतीने वारंवार गर्दी न करण्याच्या सूचना करूनही कोणीही दखल घेत नसल्याने मंचर पोलिसांनी मोटारसायकल चालक आणि मोकाट फिरणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे. पुणे, मुंबई येथे व्यवसायासाठी आणि नोकरीसाठी गेलेले नागरिक करोना व्हायरसच्या भीतीने गावाला आले आहेत.
अवसरी ग्रामपंचायतीने सुमारे 900 जणांच्या हातावर शिक्के मारले असतानाही त्यातील काही सर्रास गावात फिरत आहेत, काही जण पार्ट्या करण्यात मश्गुल आहेत. याबाबत मंचर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णदेव खराडे म्हणाले की, विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर तसेच गर्दी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.