नवी दिल्ली: दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती माळीवाल यांचा मोबाइल फोन मध्य दिल्लीच्या पहाडगंज भागात चोरीला गेला होता. परंतु पोलिसांनी आरोपीला अटक करत फोन जप्त केला आहे. आयोगाच्या सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी माळीवाल वृद्ध महिलेला मदत करण्यासाठी पहाडगंजला गेले असता चोरी झाली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा फोन मंगळवारी जप्त केल्याची माहिती दिली.
फोन चोरीच्या आरोपाखाली रोहन उर्फ विनोद नावाच्या व्यक्तीस अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीचे काही गुन्हेगारी नोंद आहे का याचा तपास केला जात असल्याचे पोलीस म्हणाले.