प्राथमिक उपचार तत्काळ मिळणार : केंद्र शासनाकडून मिळाली दहा महापालिकांना मंजुरी
पिंपरी (प्रतिनिधी)-पिंपरी-चिंचवड शहरातील आरोग्य केंद्रापासून दूर असलेल्या भागातील नागरिकांना तात्काळ आणि विनामूल्य उपचार मिळावे, यासाठी शहरामध्ये फिरत्या वाहनातून प्राथमिक उपचार आणि सेवा देण्यात येणार असून पिंपरी-चिंचवड महापालिकेला मोबाईल मेडीकल युनिट सुरु करण्याच्या निविदा प्रक्रियेला मान्यता द्यावी, असा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे, शहरातील रुग्णांना आता लवकरच मोबाइल मेडीकल युनिटद्वारे उपचार मिळणार आहेत.
सरकारच्या वतीने सन 2018-2019 पासून राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत विविध जिल्ह्यातील ग्रामीण भागात तसेच झोपडपट्टी व आरोग्य केंद्रापासून दूर असलेल्या भागांमध्ये फिरत्या वाहनामध्ये रुग्णांना प्राथमिक उपचार विनामूल्य देण्याची सेवा सुरु करण्यात आली होती. ग्रामीण भागाचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला असला तरी बहुतांश शहरी भागात ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली नव्हती. परिणामी ही सेवा मोठ्या शहरातही सुरु करावी अशी मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर यावर्षी केंद्र शासनाकडील मंजूर वार्षिक कृती अंमलबजावणी आराखड्यामध्ये आणखी दहा मेडीकल युनिट सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील दहा महानगर पालिका क्षेत्रामध्ये मेडीकल युनिट सुरु करण्याला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचाही समावेश असल्याने आता पिंपरी-चिंचवड शहरात लवकरच मेडीकल मोबाइल युनिट सुरु होणार आहे.
ही मोबाईल युनिट सेवा बाह्य पुरवठादाराकडून कार्यान्वित करण्यात येणार असून यामध्ये कंत्राटदारानेच वाहन खरेदी करुन त्यामध्ये मेडीकल साहित्यासह सेवा सुविधा उपलब्ध करायच्या आहेत. यासाठी 1 कोटी 80 लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे.