पुणे – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकावर सुमारे दिडशे जणांच्या जमावाने हल्ला केला. यामध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. इतकेच नव्हे तर जमावाने पोलिसांच्या खबऱ्याचा खून करण्याचा प्रयत्न देखील केला आहे. या जमावात मोठ्या संख्येने महिलाही होत्या. यामुळे पोलिस दलात खळबळ माजली आहे. हा प्रकार वारज्यातील म्हाडा कॉलनीत घडला आहे.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी श्रीकांत दगडे (वय 33) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दीडशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत दगडे हे गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकात (1) कार्यरत आहेत. दगडे त्यांच्या सहकारी ऋषिकेश कोळप यांच्यासह मंगळवारी रात्री वारजे येथे पेट्रोलिंग करण्यास गेले होते.
यावेळी त्यांना त्यांच्या खबरी मार्फत माहिती मिळाली होती की अभिजित खंडागळे नावाच्या व्यक्तीकडे गावठी पिस्तुल आहे. तसेच तो साथीदारासह जबरी चोरी करणार आहे. तो राहण्यास म्हाडा कॉलनी इमारत दोन येथे चौथ्या मजल्यावर राहतो. त्यानुसार ही माहिती दगडे यांनी त्यांच्या वरिष्ठांना दिली.
यानंतर ते एका मित्रालासोबत घेऊन खबरी धिरज डोलारे व सहकारी पोलीस म्हाडा कॉलनी येथे गेले. त्यांनी सोसायटीखाली गाडी पार्क करुन चौथ्या मजल्यावरील अभिजित याच्या रूमचे दार वाजवले. हा दरवाजा एका महिलेने उघडला. त्यांनी महिलेला अभिजित याच्याबाबत विचारपूस करत चौकशी केली.
महिलेने तो बाहेर गेला असल्याचे सांगितले. तोपर्यंत येथे मोठ्या प्रमाणात सोसायटीमधील जमाव जमला. यामुळे दगडे यांना परिस्थिती संशयास्पद वाटली. ते खबरीला सोबत घेत खाली आले. यावेळी मात्र इमारती खाली मोठ्या प्रमाणावर जमाव जमला होता. त्यातील काहींनी खबऱ्याला पाहत तू आमच्याबाबत पोलिसांना माहिती देत असतो, आज तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
तर बांबू, विटा, सिमेंटच्या ब्लॉकने त्याला मारहाण केली. यात त्याच्या डोक्यात जबर मार लागल्याने त्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. दगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जमावाला आम्ही पोलीस आहोत असे सांगूनही जमाव ऐकत नव्हता. यामुळे दगडे व त्यांचे सहकारी त्याला वाचवण्यामध्ये पडले असता त्यांनाही जमावाने बेदम मारहाण केली.
“घटनेमध्ये खबरी व्यक्तीला मार लागला आहे. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना दोन पोलिस कर्मचाऱ्यांशी जमावाने झटापट केली. सुमारे 125 ते 150 व्यक्तींवर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्याची कार्यवाही सुरु आहे.” -श्रीनिवास घाडगे (पोलीस उपायुक्त, गुन्हे)