नागपूर – नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
खैरे म्हणाले की, आमदार बांगर मटका चालवून रोज एक लाख रुपयांचा हप्ता जमा करतात. मला याबाबत सर्व माहिती आहे. बांगर मटका आणि इतर लफडे करून त्यातून हप्ते वसूल करतात. त्यांचे संपूर्ण चरित्र मला माहिती आहे. या सर्वांतून बचाव व्हावा म्हणून बांगर सत्ताधारी शिंदे गटात गेले आहेत. ज्यांची लफडी आहेत अशाच लोकांना शिंदे आपल्याकडे धमकी देऊन ओढत असल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे.
पुढे बोलतांना खैरे म्हणाले की, आम्ही मराठवाड्यात शिवसेना टिकवली म्हणून तुम्ही मोठे झालात. आज शिंदे यांच्या जीवावर बांगर शिवसेनेवर बोलत आहे. मात्र एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद लवकरच जाणार आहे. त्याची सुरवात आजपासून झाली आहे. संजय राऊत यांच्याकडे बांगर अनकेदा पाया पडण्यासाठी जात होते. त्यामुळे आता त्यांना आम्ही सरळ करून टाकू असा इशारा खैरे यांनी यावेळी दिला. दरम्यान, हिवाळी अधिवेशनात अनेक प्रश्नांवरून विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसून येत आहेत.