विजय सोनवणे
खेड – एकाच रस्त्याचे दोन वेळा तेही दोन्ही आमदारांनी भूमिपूजन केलेल्या अर्धवट रस्त्याच्या कामाला अद्यापही मुहूर्त लागत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. खेड-आगवणवस्ती अशा या बहुचर्चित रस्तासाठी ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी आणि मागणी करूनही याची कसलीच दखल घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लोकप्रतिनिधी, ठेकेदार, अधिकाऱ्यांचा मेळ बसत नसल्याने हे अर्धवट काम अजून किती दिवस रखडणार? असा सवाल येथील संतप्त ग्रामस्थ करीत आहेत.
आमदार राम शिंदे यांच्या प्रयत्नातून सन 2018 साली खेड ते आगवणवस्ती या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्याला 87 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता आणि त्यावेळी तत्कालीन मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजनही करण्यात आले होते. त्यानंतर काही स्थानिक अडचणींमुळे व तक्रारींमुळे हे काम थांबले. त्यानंतर सन 2020 साली आमदार रोहित पवार यांनी फेरसर्वेक्षण करून हेच 1 किमीचे काम 66 लाख निधी मंजूर करून दुसऱ्यांदा भूमिपूजन केले.
त्यानंतर काही महिन्यांनी काम सुरूही झाले, मात्र कामाचा दर्जा पाहून ग्रामस्थांनी कर्जतच्या संबंधित ठेकेदाराला कडाडून विरोध केला. आणि हे काम अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे.त्यानंतर आ. राम शिंदे, आ. रोहित पवार या दोन्हीही लोकप्रतिनिधींकडे ग्रामस्थांनी अनेकवेळा पाठपुरावा केला. मात्र ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचे नियंत्रण व वचक नसल्याने ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी ते कमी पडले.
आमदारांना खासदार ठरणार का भारी?
ग्रामस्थांनी मतदारसंघाच्या दोन्ही आमदारांकडे पाठपुरावा करूनही त्यांनी दखल घेतली नाही. मात्र खासदार डॉ. सुजय विखे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्याला पत्र देऊन रस्त्याचे काम तातडीने करावे, अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे रस्ता कामाला मुहूर्त लागला तर दोन्ही आमदारांना खासदार भारी ठरणार अशी चिन्हे दिसत आहेत.