रेल्वेत चोरांनी चक्क आमदारांनाच लुटले

मुंबई : सध्या मुंबईत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून, अधिवेशनासाठी एक्स्प्रेस रेल्वेने मुंबईला येणाऱ्या आमदारांच्या बॅगांवर चोरांनी हात साफ केल्याच्या घटना घडल्या आहेत. चक्क आमदारांसाठी राखीव असलेल्या बोगीतच घुसून चोरट्यांनी शिवसनेचे आमदार डॉ. संजय रायमुलकर , आमदार डॉ. शशिकांत खेडेकर आणि चिखलीचे काँग्रेसचे आमदार राहूल बोंद्रे  यांच्याकडील साहित्य लुटल्याची घटना समोर आली आहे.

या दोन्ही घटना 24 जून रोजी अनुक्रमे विदर्भ एक्सप्रेस आणि देवगिरी एक्सप्रेसमध्ये कल्याण रेल्वे स्थानकानजीक घडल्या. सोमवारी देवगिरी एक्स्प्रेमध्ये शिवसेनेच्या दोन तर आज मंगळवारी आमदार राहुल बोंद्रे यांच्या पत्नीला चोरांनी लुटले आहे. याबाबत लोहमार्ग पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विदर्भ एक्स्प्रेसमध्ये बुलढाण्यातील चिखली मतदार संघातील आमदार राहुल बोंद्रे यांच्या पत्नीची पर्स चोरीला गेली आहे. पर्समध्ये 26 हजारांची रोख रक्कम, एटीएम कार्ड आणि महत्वाची कागदपत्रे होती.

दुसरीकडे याच कालावधीत मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर आणि डॉ. शशिकांत खेडेकर हे जालना येथून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईसाठी निघाले होते. तेही कल्याण-ठाणे दरम्यान असताना डॉ. रायमुलकर यांच्या खिशातील रोख दहा हजार रुपये आणि ५६ हजार रुपयांचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. आमदार खेडेकर यांचीही बॅग चोरट्यांनी ब्लेडने कापल्याचे लक्षात आले. सुदैवाने त्यातून काही चोरीला गेले नाही. परंतू चोरट्यांनी त्यांच्या बॅगमधीलही साहित्य चोरण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले.

अधिवेशनासाठी विशेष असणाऱ्या बोगीमधून चोरी झाल्यामुळे याप्रकरणी आमदार डॉ. संजय रायमुलकर, डॉ. शशिकांत खेडेकर आणि राहुल बोंद्रे यांनी लोहमार्ग पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच आमदारांसाठी राखीव असलेल्या बोगीत चोर कसे काय आले असा प्रश्न आमदारांनी उपस्थित केला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×