राहुल गांधींचा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे?

नवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या मानहानीकारक पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. राहुल गांधींच्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर पक्षातील जेष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचे अनेक प्रयत्न केले मात्र त्यानंतर देखील काँग्रेस अध्यक्ष आपल्या निर्णयावर ठाम राहिले होते. परंतु कालपासून राहुल गांधी यांनी देशातील विविध राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जेष्ठ काँग्रेस नेत्यांसोबत गाठीभेटींच्या तारखा ठरवल्याने राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा आपला निर्णय मागे घेणार की काय अशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु झाल्या आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, येत्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्ली येथे विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकांसाठी राहुल गांधी हे राज्यातील काँग्रेस नेत्यांसोबत संवाद साधणार आहेत. येत्या २७ जूनला राहुल गांधी हे महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांशी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा करणार आहेत तर २८ जूनला ते हरियाणा आणि दिल्ली येथील काँग्रेस नेत्यांशी सवड साधतील.

दरम्यान, राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याचा निर्णय घेतल्याने राहुल गांधी यांनीच काँग्रेस अध्यक्षपदी कायम राहावे अशी प्रार्थना करणारे काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते सुखावले आहेत. मात्र खुद्द राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा निर्णय मागे घेण्याबाबत मौन बाळगले असल्याने अजूनही राहुल गांधी राजीनाम्याचा निर्णय मागे घेणार का असा प्रश्न कायम आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.