पिंपरी – निगडी, भक्ती-शक्ती चौकातील सार्वजनिक जयंती उत्सवाची जागा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) बिल्डरांच्या घशात घातली आहे. ती जागा जयंती उत्सवासाठी राखीव ठेवण्यात यावी. त्यासाठी शासन दरबारी आपण प्रयत्न करावेत, अशी मागणी भक्ती-शक्ती शिवजयंती उत्सव समितीचे मारुती भापकर यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली आहे. त्यावर आपण यासाठी प्रयत्न करणार असल्याचा शब्द आमदार भोसले यांनी दिला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व शिवजयंती उत्सव समन्वय समितीच्या वतीने व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने निगडी येथील भक्ती-शक्ती समूहशिल्पासमोर शिवराज्याभिषेकाच्या साडेतीनशे वर्षानिमित्त युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांना ढोल ताशे वाजवून, भगवे झेंडे नाचवत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत मानवंदना देण्यात आली. या वेळी भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप, चिंचवड देवस्थानचे गिरीश प्रभुणे, माजी पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक अमित गावडे, संदीप जाधव आदी उपस्थित होते.
भक्ती-शक्ती समूहशिल्पाच्या बाजूला सार्वजनिक जयंती उत्सवासाठीची जागा पीएमआरडीएने बिल्डरांना विकली आहे. ती जागा सार्वजनिक जयंती, कार्यक्रम, उपक्रम, गावजत्रा उत्सव घेण्यासाठी खुली करावी, अशी आमची मागणी आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल यांच्याकडे ही जागा देण्याचे आदेश दिले होते. तरी ही जागा आम्हाला दिली जात नाही. आपण आपल्या स्तरावर ही जागा जयंती उत्सव व सार्वजनिक उपक्रमांसाठी राखीव ठेवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करावेत, अशा मागणीचे निवेदन देऊन सामाजिक कार्यकर्ते भापकर यांनी ही बाब आमदार भोसले यांच्या कानावर घातली. त्यावर हा विषय खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार असल्याचा शब्द भोसले यांनी दिल्याचे भापकर यांनी सांगितले.