पुणे – शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज झाली आहे, पर्यावरणपूरक गणेशोत्सवास साजरा करण्यासाठी महापालिकेकडून यंदाही उपाययोजना राबविण्यात येत आहे. यात भाविकांसाठी पाणी, स्वच्छता तसेच सुरक्षेच्या अनुषंगाने तयारी करण्यात आली आहे.
नैसर्गिक स्रोतांमध्ये मूर्ती विसर्जन न करता पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याकरीता गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन हौदाद्वारे मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. शहरात एक दिवसाच्या गणपतीचेही विसर्जन होत असल्याने उत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच तयारी केली जाते.
300 ठिकाणी विसर्जन सुविधा
महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण 42 बांधलेले हौद, एकूण 265 ठिकाणी 568 लोखंडी टाक्या या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रत्येकी 10 फिरत्या विसर्जन हौदांची सुविधाही ठेवण्यात येणार आहे. 252 ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्रे, गणेशमूर्ती दान केंद्रे उभारण्यात आली आहेत. सोबतच 256 निर्माल्य कंटेनरची व्यवस्था करण्यात आली आहे.
आपत्कालीन संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक
गणेशोत्सवात आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास नागरिकांना मदत हवी असल्यास महापालिकेच्या 020-2550-1269 020-2550-6800 ( 1 /2 /3/4) या क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांना 9689-93-1511 या मोबाइल क्रमांकावरही थेट संपर्क साधू शकतील. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनाही 8108-07-7779 या क्रमांकावर संपर्क साधू शकणार आहेत.
विसर्जन घाटांवर अग्निशमन दल तैनात
श्री गणेश विसर्जनासाठी अग्निशमन केंद्रांच्या वतीने मुठा नदीपात्रालगत असणाऱ्या विसर्जन घाटांवर येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव दलाकडील प्रत्येकी 1 फायरमन दुपारी एक ते रात्री नऊ या वेळेत आणि प्रत्येकी 2 जीवरक्षक तीन पाळ्यांमध्ये नियुक्त करण्यात येणार आहेत. सदरील कर्मचाऱ्यांवर नियंत्रणासाठी या घाटांवर अग्निशमन अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात येणार असून गणेशोत्सवाचे कालावधीतील विविध दिवशींचे विसर्जन आणि दि. 28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशीचे संपूर्ण विसर्जन संपेपर्यत संबंधित अधिकारी सदरील विसर्जन घाटांवर उपस्थित राहून नियंत्रण ठेवणार आहेत. नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मूर्ती दान करावी, याबाबत जागृती करण्यात येत आहे.
शहरात तीन वेळा स्वच्छता
गणेशोत्सवात शहरात स्वच्छता राखली जाण्यासाठी रस्ते, ओपन प्लॉट, क्रॉनिक स्पॉट, नदीपात्र, नदीघाट, विसर्जन हौदांची ठिकाणे, सार्वजनिक गणेश मंडळांचे परिसर येथे दिवसातून दोन वेळा, तर सार्वजनिक स्वच्छतागृहे तीन वेळा स्वच्छ केली जाणार आहेत. एकूण 400 फिरत्या टॉयलेटची सुविधा असेल. 1,183 सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती नागरिकांना ऑनलाइन ऍपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहर स्वच्छतेसाठी जवळपास दोन हजारहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.