जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत “रिलायन्स इन्फ्रा’ला कानपिचक्या
सातारा – महामार्गासह सेवा रस्त्यांची रस्ते मानकांप्रमाणे येत्या पंधरा दिवसात दुरूस्ती करण्यात यावी अन्यथा सोळाव्या दिवशी महामार्गावर टोल बंद आंदोलन राबवण्यात येईल असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी राष्ट्रीय महामार्ग रस्ते प्राधिकरणाच्या बोलवलेल्या बैठकीत ठेकेदाराला तातडीने महामार्गाचे कारपेटिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीला रिलायन्स इन्फ्रासह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व साताऱ्यातील तक्रारदार नागरिक यावेळी उपस्थित होते . ग्वाल्हेर बेंगलोर आशियाई महामार्ग क्रमांक 47 हा सातारा जिल्ह्याच्या हद्दीत 121 किलोमीटर लांबीचा आहे. आनेवाडी व तासवडे या दोन टोल नाक्यांवर ज्या प्रमाणात टोल दिला जातो. त्या तुलनेत सुविधा मिळत नाही. गुळूंब-जोशीविहीर-बावधन – भुईज – आनेवाडी – लिंब- खिंडवाडी – शेंद्रे – अतित या दरम्यान महामार्गाला प्रचंड खड्डे पडल्याची तक्रार रविंद्र नलावडे यांनी बैठकीत केली.
आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी महामार्गाच्या असुविधांचा मुद्दा उचलून धरत रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली. ठेकेदार कंपनीकडून तक्रारीची दाद घेतली जात नाही असाही सूर बैठकीत आळवण्यात आला. रिलायन्स इन्फ्राचे प्रकल्प सचिव आर. एस. गांधी यांनी महामार्गाचे व सेवा रस्त्यांचे दर्जेदार कारपेटिंग करून देऊ असे आश्वासन दिले.
मिटिंग झाली म्हणजे संपले असे नाही, महामार्गाच्या कामाचा वेळोवेळी मिटिंग बोलावून आढावा घेतला जाईल, त्यामुळे जबाबदारीने वेळेत कामे पूर्ण करा, अशा स्पष्ट कानपिचक्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी ठेकेदार कंपनीला दिल्या. महामार्गाची दुरुस्ती पंधरा दिवसात न झाल्यास सोळाव्या दिवशी टोल बंद आंदोलन करण्याचा इशारा शिवेंद्रराजे यांनी दिला.
टोलनाक्याच्या वीस किलोमीटर परिघातील गावांना सवलतीच्या दरात पास देण्याची तरतूद आहे. जी गावे या परिघात येतात त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल या सुविधेचा सातारकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवेंद्रराजे यांनी केले. शिवाय ज्यांनी या सवलती घेतल्या आहेत त्यांची ही यादी ठेकेदारांकडून मागवल्याचे शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले. रविंद्र नलावडे यांनी महामार्ग दुरूस्त न झाल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.