कर्जत -राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान एका प्रचार सभेत पावसात भिजून सभेला संबोधित केले होते. पावसातील या सभेची चर्चा होऊन राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत फायदा झाला होता. दुसरीकडे पावसात भिजण्यामुळे आता रोहित पवार हे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होताना दिसत आहेत. छत्री असूनही पावसात भिजणं, नेमकं का आणि कशासाठी?, आमदार रोहित पवार यांचा हातात छत्री असूनही पावसात भिजत असलेला फोटो टाकून “या फोटोसाठी कॅप्शन सुचवा’, असे नेटकरी म्हणत आहेत.
रोहित पवार हे सातारा दौऱ्यावर गेले असताना त्यांनी माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील प्रीतिसंगम या समाधीस्थळी वडील राजेंद्र पवार यांच्यासह भेट देऊन अभिवादन केले. यादरम्यान येथे पाऊस सुरू होता. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी फोटो काढले.
त्यानंतर आमदार पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून म्हटले की, देशाच्या राजकारणातील सुसंस्कृत नेते आणि हिमालयाच्या मदतीला धावून गेलेला सह्याद्री असं ज्यांचं वर्णन केलं जातं त्या माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील प्रीतिसंगम या समाधीस्थळी बाबांसह भेट देऊन अभिवादन केलं. नेहमीप्रमाणे आजची भेटही प्रेरणादायी होती.
दर्शन घेताना त्यांनी येथे काही फोटो काढले. यामध्ये त्यांचे वडिलही दिसून येत आहेत. वडील राजेंद्र पवार यांनी डोक्यावर छत्री घेतली असल्याचे दिसून येत आहे. मात्र, आमदार रोहित पवार हातात छत्री घेऊन पावसात भिजत उभे राहिले. त्यामुळे आमदार पवार यांचे ते फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. छत्री असूनही पावसात भिजणं नेमकं का आणि कशासाठी?, फोटोसाठी कॅप्शन सुचवा, अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर दिसत आहेत.