कोलकाता: पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेर अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कोलकाताच्या ब्रिगेड परेड ग्राऊंडमध्ये रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी पश्चिम बंगालमधील प्रमुख भाजप नेत्यांच्या उपस्थितीत मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय, मुकुल रॉय, सुवेंदु अधिकारी हे नेते उपस्थित होते.
West Bengal Assembly polls: Actor Mithun Chakraborty joins BJP
Read @ANI Story | https://t.co/PfA1sibymP pic.twitter.com/znmp5xDSJZ
— ANI Digital (@ani_digital) March 7, 2021
थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदीही याठिकाणी येणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणापूर्वी मिथुन चक्रवर्ती यांना भाषण करण्याची संधी मिळेल, अशी चर्चा आहे. यावेळी मिथुन चक्रवर्ती यांच्या इच्छेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना भेटतात का? हेदेखील पाहावे लागेल.
तत्पूर्वी आज सकाळीच मिथुन चक्रवर्ती यांनी भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांची भेट घेतली होती. कैलास विजयवर्गीय हे मिथुन चक्रवर्ती यांच्या बेल्गाचिया येथील निवासस्थानी गेले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा झाली. तेव्हा मिथुन चक्रवर्ती आज भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात होती. ही शक्यता अखेर खरी ठरली आहे.