मानसोपचार : पालक व्यस्त असणे मारक!

पुणे – समिहनची आई समिहनला घेऊन स्वतःहूनच भेटायला आली. समिहन आईबरोबर आला आणि खुर्चीवर अगदी शांत बसून राहिला. तो पाच वर्षांचा होता, पण अगदीच शांत आणि गंभीर भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. समिहनच्या आईने त्यांची ओळख करून दिली.

“हा समिहन माझा मुलगा. पाच वर्षांचा आहे. मी त्याची आई. मी एका आयटी कंपनीत काम करते. मी, माझे पती आणि समिहन असे आम्ही तिघेजण राहतो. माझे पती पण आयटी कंपनीतच काम करतात. आमचा समिहन तसा एकदम शहाणा मुलगा आहे. शाळेत, घरी तो एकदम छान असतो. छान खेळतो. मज्जा मस्ती करतो. पण गेल्या 2-3 महिन्यांपासून त्याचं काहीतरी बिनसलंय. सुरुवातीला जरा चिडचिडा झाला होता.

सध्या त्याचे आजी-आजोबा आमच्या सोबतीसाठी आले आहेत. त्यांच्याशी त्याची खूप गट्टी आहे. त्यांच्याबरोबर खेळणं, फिरायला जाणं, गप्पा मारणं त्याला खूप आवडतं. पण सध्या काय बिनसलंय तेच कळत नाही हो. खूपच चिडचिडा झालाय. त्यांच्याबरोबर असतानाही चिडचिड करतो. खेळायला जात नाही. फिरायला जात नाही. सगळ्याला नको नको म्हणतो. त्याच्या कलाने घ्यायचा आम्ही प्रयत्न केला, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही.

हल्ली तर सगळ्यांना मारायला शिकलाय. त्याच्या मनाविरुद्ध काही घडलं की, रडून-रडून घर डोक्‍यावर घेतो. खूप हट्टी आणि संतापी झालाय. आमचे काही ऐकतच नाही. काय झालंय तेच समजत नाही. शेवटी नाईलाजाने त्याला घेऊन आले. आजी-आजोबा म्हणाले की थोडे दिवसांनी होईल शांत. पण याचं असं वागणं वाढतच चाललंय. आता आठवडाभर रोज रात्री रडत-रडत उठतो. घाबरल्यासारखा वाटतो. म्हणून मीच त्याला इकडे घेऊन येण्याचा निर्णय घेतला. काय झालंय त्याला काहीच समजत नाही हो.’ एवढं बोलून आई थांबली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. आई बोलत होती ते सगळं समिहन मान खाली घालून ऐकत होता. मध्येच आईकडे बघत होता, पण या संपूर्ण सत्रात तो एकदम शांत मान खाली घालून ऐकत होता.

आईशी बोलणं झाल्यावर समिहन बरोबर संवाद साधण्याचा थोडा प्रयत्न केला, पण अर्थातच तो लहान असल्याने व ओळख नसल्याने तो फारसे काही बोलला नाही. बोलताना घाबरत होता. त्यामुळे आईकडून आवश्‍यक अशी अधिक माहिती घेऊन हे सत्र थांबवले. आईशी झालेल्या यानंतरच्या चर्चेतून समिहनच्या समस्येचा थोडा अंदाज आला होता. पण ती नक्की होण्यासाठी त्याच्याशी अधिक संवाद साधणे गरजेचे होते. त्यामुळे पुढील काही सत्रे समिहनबरोबर घेण्यात आली.

या सत्रांचा उद्देश त्याचा विश्‍वास संपादन करणे हाच होता. 3-4 सत्रांनंतर चांगली ओळख झाल्यावर समिहन थोडा मोकळा झाला. थोडं थोडं बोलायला लागला. पण आपण असे का वागतो. याबाबत “मग मला खूप राग येतो आणि भीती वाटते,’ एवढंच उत्तर तो देत होता. वय लहान असल्याने तो याबाबत आणखी काही सांगू शकत नव्हता. त्यामुळे त्याची चित्र चाचणी घेण्याचे ठरवले.

पुढील सत्रात समिहनला चित्र काढण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला तो नाही म्हणत होता. पण नंतर मात्र त्याने चित्र काढून दाखवले. त्या चित्रात त्याने त्याचे घर काढले. ज्यात त्याची आई, बाबा, आजी, आजोबा सर्वजण होते. पण बाकी सगळे त्याच्याजवळ असले तरी त्याने बाबांचे चित्र मात्र लांब काढले होते आणि अजून बरेच काही काढले होते. त्याच्या चित्राबाबत सविस्तर चर्चा केल्यावर, त्याला काही प्रश्‍न विचारल्यावर त्याची अंदाज आलेली समस्याच असल्याचे लक्षात आले.

समिहन त्याच्या बाबांचा खूप जवळचा होता. त्याला बाबा खूप आवडत होते. बाबांवर त्याचे खूप प्रेम होते. पण कंपनीकडून संधी मिळाल्यामुळे ते 6-7 महिन्यांसाठी परदेशी गेले होते. रोज घरी येऊन त्याच्याशी खेळणारे, मस्ती करणारे बाबा, खूप प्रेम असणारे बाबा अचानक असे लांब गेल्याने हा बदल पचवणे त्याच्या छोट्या वयाला खूपच अवघड जात होते आणि ते सारे त्याच्या वर्तनातून दिसत होते. त्याची ही समस्या या चाचणीतील चित्रातून आणि संवादातून लक्षात आली. त्या सत्रात देखील बाबांची आठवण आली म्हणून समिहन खूप रडला.

त्याच्या समस्येचे निदान झाल्यावर त्याची कल्पना समिहनच्या आईला दिली. त्यांच्याशी याबाबत चर्चा करून काही उपाययोजना त्यांना सुचवल्या. त्यांनी त्याप्रमाणे प्रयत्न केले. समिहनचा आता रोज बाबांशी संवाद होऊ लागला. ज्यातून थोड्या दिवसात बाबा परत येणार आहेत हे त्याला समजू लागले. बाबांपासून विलग होण्याची त्याची मनातली भीती गेल्याने तो आता हळूहळू परत पूर्वीसारखा होऊ लागला. (केसमधील नाव बदलले आहे.)
– मानसी तांबे-चांदोरीकर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.