काळभोर- एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजीनियरिंग सायन्स आणि रिसर्चच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय आनुवंशिक अभियांत्रिकी मशीन (आयजीईएम) फाउंडेशनद्वारा अमेरिकेतील बोस्टन येथे आयोजित कृत्रिम जीवशास्त्र क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक मिळवले, अशी माहिती एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजीनियरिंग सायन्स आणि रिसर्चच्या प्राचार्या डॉ. रेणू व्यास यांनी दिली.
डॉ. व्यास म्हणाल्या, सिंथेटिक बायोलॉजीच्या प्रगतीसाठी आयजीईएम फाउंडेशनद्वारा आयोजित स्पर्धेमध्ये जगभरातून 400 हून अधिक संस्थांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत एमआयटी बायोच्या विद्यार्थ्यांनी मासिक पाळीच्या कचऱ्याच्या कार्यक्षम पर्यावरणीय बायोडिग्रेडेशनसाठी कृत्रिमरित्या अभियांत्रिकीकृत जीवाणूंच्या निर्मिती संदर्भातील पोस्टर आणि तोंडी सादरीकरण, वेबसाइट डेव्हलपमेंट, समाज विकासासाठी भविष्यकालीन प्रस्तावित प्रकल्पातील निष्कर्ष या विषयावर माहिती सादर केली.
मासिक पाळीच्या कचऱ्याच्या कार्यक्षम पर्यावरणीय बायोडिग्रेडेशनसाठी कृत्रिमरित्या अभियांत्रिकीकृत जीवाणूंच्या निर्मिती संदर्भातील नावीन्यपूर्ण कल्पनेवर आधारित प्रोजक्ट सादर केले. याला केंद्र सरकारचे डीबीटी अनुदान मिळाले होते. यात एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजीनियरिंग सायन्स आणि रिसर्चच्या पदवीचे विद्यार्थी आशिमा खन्ना, ओंकार दाते, दिव्या शेट्टी, अनु ओसवाल, अजय एक्स्ट्रोस यांचा सहभाग होता. यशाबद्दल एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड, कुलगुरू डॉ. सुनील राय, डॉ. रेणू व्यास, एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजीनियरिंग सायन्स आणि रिसर्चचे संचालक प्रा. विनायक घैसास यांनी अभिनंदन केले.