निमगाव म्हाळुंगी येथील घटना : पाच जणांवर गुन्हा दाखल
शिक्रापूर- निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील विवाहितेला माहेरहून पैसे आणण्यासाठी कायम मारहाण करून छळ करत तिला विवाहितेच्या आई वडिलांना मारहाण करून विवाहितेला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी प्रियांका अमोल रणसिंग (रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रियांकाचे पती अमोल काळूराम रणसिंग, सासू छबूबाई काळूराम रणसिंग, सासरे काळूराम रणसिंग, दीर आबा काळूराम रणसिंग, जाऊ रंजना आबा रणसिंग (सर्व रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. निमगाव म्हाळुंगी येथील विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रियांका रणसिंग हिचा विवाह अमोल रणसिंग यांच्यासोबत 2010 मध्ये झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच प्रियांका हिस माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावत पैशासाठी छळ करून मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी प्रियांकाच्या आई वडिलांनी मुलीला त्रास नको म्हणून पाहुण्यांकडून पैसे घेऊन प्रियांकाच्या पतीला दिले, तरी देखील अनेकदा प्रियांकाचा पती अमोल हा पत्नीला मारहाण करीत होता.
दिवाळी झाल्यामुळे प्रियांकाचे आई वडील प्रियांकाला दिवाळीचा फराळ देण्यासाठी आले असताना पैशांवरून पतीने प्रियांकाच्या आईवडिलांना मारहाण करून अमोल याने स्वतःचे कपडे फाडून घेतले. त्यांनतर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियांकाची जाऊ रंजना हिने प्रियांकास शिवीगाळ करीत भांडणे करण्यास सुरवात केली. त्यावेळी प्रियांका हिस पती, सासू, सासरे, दीर व जाऊ यांनी मारहाण केली. तेव्हा प्रियांकाचे आई वडील भांडणे सोडविण्यासाठी आले असताना त्यांना मारहाण केली. त्याचवेळी पती अमोल हा बाहेर जाऊन डब्यात पेट्रोल घेऊन आला. त्याने प्रियांकाच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. प्रियांकाचे आई वडील आग विझविण्यासाठी आले असताना त्यांच्या हाताला भाजले आहे. पुढील तपास पोलीस सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट करीत आहेत.