8 डिसेंबर रोजी मतदान तर 9 डिसेंबरला निकाला
मंचर- आंबेगाव तालुक्यातील एका ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक आणि 21 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका सोमवारी (दि. 8डिसेंबर) होणार आहे. या पोटनिवडणुकीमध्ये मंचर ग्रामपंचायतीचाही समावेश आहे, तसेच महाळुंगे तर्फे घोडा आणि नांदुर या ग्रामपंचायतीमधील रिक्त सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे.
आंबेगाव तालुक्यातील 14 डिसेंबर 2019 ते 31 मार्च 2020 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूक व थेट निवडणुकीद्वारे भरण्यात येणाऱ्या रिक्त सरपंचपदांसह रिक्त सदस्यपदांच्या पोटनिवडणुकांचा ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामध्ये विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. तर ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये मंचर, चपटेवाडी, पिंपळगांव तर्फे महाळुंगे, पेठ, जांभोरी, महाळुंगे तर्फे घोडा, पोखरी, भराडी, पाटण, फुलवडे, टाकेवाडी, गंगापुर खुर्द, चासची ठाकरवाडी, फदालेवाडी-उगलेवाडी, गावडेवाडी, चिंचोली कोकण्याची, चिखली, गोहे खुर्द, नांदुर, लौकी व लांडेवाडी-पिंगळवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे भरण्यासाठी शनिवार (दि. 16) ते गुरुवार (दि. 21) या कालावधीमध्ये शासकीय सुट्ट्या सोडुन इतरवेळी भरता येणार आहे. छाननी शुक्रवारी (दि. 22), अर्ज सोमवारी (दि. 25) दुपारी तीन वाजेपर्यंत माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून दुपारी तीननंतर चिन्हवाटप होणार आहे. तर मतदान सोमवारी (दि. 8) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे. मतमोजणी मंगळवारी (दि. 9) होणार असल्याचे तहसीलदार रमा जोशी यांनी सांगितले.