‘नगर अर्बन’च्या पिंपरी चिंचवड शाखेत 22 कोटींचा गैरकारभार..!

नगर – नगर अर्बन बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेत तब्बल 22 कोटी रुपयांचा गैरकारभार झाल्याचे अलीकडेच लेखापरीक्षण अहवालात उघडकीस आले आहे. सबब, या गैरकारभारास जबाबदार असलेले तत्कालीन पदाधिकारी, संचालक मंडळ व अधिकार्‍यांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी बँकेच्या मुख्यालयात प्रशासकांच्या दालनात आज माजी संचालक व सभासदांनी तीव्र आंदोलन पुकारले.

अखेरीस बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांनी या कथित गैरकारभाराची फिर्याद देण्यासाठी बँकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याची तातडीने नेमणूक करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले. बँकेचे ते वरिष्ठ अधिकारी फिर्याद देण्यासाठी दुपारनंतर पिंपरी चिंचवडला दुपारनंतर रवाना झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

नगर अर्बन बँक बचाव समितीचे पदाधिकारी व बँकेचे माजी संचालक राजकुमार गांधी, पोपट लोढा, भैरवनाथ वाकळे, अनिल गट्टाणी, हृषीकेश आगरकर, रवींद्र सुराणा, मनोज गुंदेचा, रूपेश दुग्गड, संजय वल्लाकट्टी, राहुल लोढा, संजय भळगट आदींनी आंदोलन पुकारले होते. यावेळी करण्यात आलेल्या घोषणाबाजीने बँक दणाणून गेली.

अर्बन बँकेचा वाढत चाललेला एनपीए, बँकेची अलीकडे खूपच कमी होत चाललेली थकबाकी वसुली चिंताजनक आहे. तसेच फसवणुकीची रक्कम वसूल करण्याकामी जाणीवपूर्वक व विशिष्ट हेतूने टाळटाळ होत असल्याचा थेट आरोप आंदोलनात सहभागी झालेल्यांनी प्रशासकांवर केला. चिंचवड शाखेत 22 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून, त्यात दोन कंपन्या सहभागी आहेत. लेखापरीक्षणात हे उघड झाले असताना गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ कशासाठी होते? असा सवालही आंदोलकांची उपस्थित केला.

तत्कालीन पदाधिकारी व संचालकच जबाबदार
तब्बल 22 कोटी रुपयांच्या या गैरकारभारास तत्कालीन पदाधिकारी व संचालकच मंडळच जबाबदार आहे. एका रात्रीत कर्ज मंजूर करून घेत त्यातील अकरा कोटी रुपये पदाधिकार्‍यांनी घेतले, असा गंभीर आरोप आंदोलकांनी केला. संगनमत करून हा घोटाळा केल्याचे उघड आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई व्हायलाच हवी, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. अखेरीस गुन्हा दाखल करण्याकामी वरिष्ठ अधिकार्‍याची नेमणूक करत असल्याचे प्रशासकांनी स्पष्ट केल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.

तीन कोटींच्या भ्रष्टाचाराचा अलीकडेच गुन्हा दाखल
बँकेच्या एका कर्जदाराच्या खात्यावर कर्जापोटी भरणा आलेला नसताना भरणा रक्कम प्राप्त झाल्याच्या बोगस पावत्या करुन दिल्या. त्यातून अर्बन बँकेची तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरुन अलीकडेच 22 डिसेंबर 2020 रोजी बँकेचे माजी खासदार दिलीप गांधी, तत्कालीन शाखाधिकारी घनश्याम बल्लाळ, कर्जदार आशुतोष लांडगे व संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बँकेच्या मुख्य शाखेचे व्यवस्थापक मारुती औटी यांनी या संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.