नगर : मृत कोंबड्यांचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’; 20000 कोंबड्यांची विल्हेवाट?

नगर – तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे काही दिवसांपासून मृत्यू झालेल्या कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, या कोंबड्यांचा बर्ड फ्लूमुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने या भागातील एक किलोमीटर परिसरातील सुमारे वीस हजार कोंबड्यांची विल्हेवाट लावली असल्याची माहिती समजते.

गेल्या दहा दिवसांपूर्वी मिडसांगवी, निंबळक, चिचोंडी पाटील, आठवड येथे सुमारे पावणेदोनशे कोंबड्या मृत आढळल्या होत्या. याशिवाय श्रीगोंदा, जामखेड तसेच नगर तालुक्यातील काही वन्य पक्षी मृत सापडले होते. यातील श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथील कावळ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. परंतु आतापर्यंत कोंबड्यांना मात्र बर्ड फ्लू झाल्याचे आढळले नव्हते.

दरम्यान, चिचोंडी पाटीलमध्ये मृत झालेल्या कोंबड्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. पशुसंवर्धन अधिकार्‍यांसह जिल्हा प्रशासन चिचोंडी पाटील भागातील एक किलोमीटरचा परिसर इफेक्टेड झोन म्हणून घोषित करणार आहे. तसेच या भागात असलेल्या सुमारे 20 ते 22 हजार कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची तयारी सुरू आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर या कोंबड्यांबाबत निर्णय होणार असून, त्यांची विल्हेवाट कशी लावायची, याबाबत निर्णय झाला नसल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सुनील तुंबारे यांनी म्हटले. तसेच काय खबरदारी घ्यायची, याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे, असेही ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.