निविदा न रोखल्यास न्यायालयात जाणार – दत्ता साने
हॉकी संघटनांनी काळ्या यादीत टाकलेल्या ठेकेदाराला दिले काम
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नेहरूनगर येथील हॉकी स्टेडियममध्ये नव्याने बसविण्यात येणाऱ्या पॉलिग्रासच्या निविदा प्रक्रियेत गैरप्रकार झाला असून काळ्या यादीतील ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे. हा प्रकार अत्यंत चुकीचा असून ठेकेदार पोसण्याचा हा प्रकार तात्काळ थांबवावा व नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी. हा विषय रेटून नेण्याचा प्रयत्न केल्यास या प्रकाराच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक दत्ता साने यांनी दिला आहे.
याबाबत साने यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लेखी निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, महापालिकेच्या नेहरूनगर येथील हॉकी स्टेडयममधील जुने पॉलिग्रास खराब झाल्याने बदलून त्या ठिकाणी नव्याने पॉलिग्रास बसविण्याविण्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध करून या कामाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. या कामासाठी महापालिका पावणे चार कोटी (3 कोटी 76 लाख 63 हजार रुपये) रुपये खर्च करून पॉलिग्रास बसविणार आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान बनविण्यासाठी हे पॉलिग्रास बसविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे, त्यासाठी राबविलेली निविदा प्रक्रिया व अधिकाऱ्यांनी केलेल्या संशयास्पद प्रक्रिया यातून संबंधित ठेकेदाराला कशा पद्धतीने मदत होईल, त्याचा फायदा कसा होईल व पालिकेचे आर्थिक नुकसान कसे होईल, या बाबी पाळण्याकडेच लक्ष दिल्यामुळे निविदा प्रक्रिया अनागोंदी पद्धतीने राबविण्यात आली असून पारदर्शकतेचा केवळ आभास निर्माण करण्यात आला आहे.
तो ठेकेदार पात्रच कसा?
ही निविदा प्रक्रिया राबविताना हॉकी खेळाशी संबंधित मान्यताप्राप्त संघटनांसोबत महापालिकेने बैठक घेणे किंवा चर्चा करणे गरजेचे होते. मात्र, अशी कोणतीही चर्चा न करताच मनमानी पद्धतीने ही निविदा राबविण्यात आली आहे. ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे, त्याबद्दलही प्रशासनाने कोणतीही माहिती न घेता ठेकेदाराला काम दिले आहे. हॉकी स्टेडीयममध्ये उच्च दर्जाचे पॉलिग्रास बसविण्यासाठी या खेळाशी संबंधित मान्यताप्राप्त संघटनांचे काही नियम व अटी आहेत. महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविताना अशा कोणत्याही अटी व शर्तींचे पालन केलेले नाही. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईतील स्पार्टिना एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हे काम दिले असून या ठेकेदाराला हॉकी खेळाशी संबंधित मान्यताप्राप्त संघटनांनी काळ्या यादीत टाकले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला पात्रच कसे केले असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हा सरळसरळ भ्रष्टाचार!
स्थायी समितीने देखील कोणतीही शहानिशा न करता याच ठेकेदाराला काम देण्यास मान्यता दिली आहे. काळ्या यादीत टाकलेल्या ठेकेदाराला हे काम दिल्यास कामाचा दर्जा काय राहिल हे वेगळे सांगायची गरज नाही. शहरात हॉकीचे चांगले खेळाडू घडविण्यासाठी नेहरूनगरमधील स्टेडियममध्ये पॉलिग्रास बसविण्याच्या कामात असा गैरप्रकार करून चांगले खेळाडू घडविण्याची अपेक्षा चुकीची असून हा सरळसरळ भ्रष्टाचार आहे. काळ्या यादीतील ठेकेदाराला काम देण्याच्या निर्णयामागे कोणाचा दबाव होता हे देखील उघड होणे गरजेचे असून ही संपूर्ण प्रक्रियाच संशयास्पद असल्याने ही निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी, अन्यथा न्यायालयात दाद मागितली जाईल, असेही या निवेदनात म्हटले आहे.