साखरेप्रमाणेच आता मधाचेही मिळणार क्युब
पुणे – विविध ठिकाणी कॉफी, चहा पिताना साखरेबरोबरच मधाचाही गोडवा नागरिकांना चाखता येणार आहे. साखरेप्रमाणेच मधाचेही क्युब आणि साचा स्वरूपात विविध विमान कंपन्या, कॉर्पोरेट कंपन्या आणि कॉफी शॉप्समध्ये ते उपलब्ध होणार आहेत. यासाठी केंद्र सरकार मध विक्रेते, विमान कंपन्या यांच्यासोबत लवकरच चर्चा करणार आहे, अशी माहिती सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. मध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने “हनी क्लस्टर’ निधीमध्ये तब्बल 10 टक्के वाढ केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय मधुमक्षिका संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र येथे मधमाशी पाल क्षेत्रातील मधमाशी पालक शास्त्रज्ञ आणि मध उद्योजक यांचे वार्षिक संमेलन झाले. यावेळी गडकरी यांनीही उपस्थिती लावली. केंद्रातील विविध उत्पादने, मधमाशी पालन वाटिका, संस्थेच्या प्रयोगशाळा यांना भेट देत, त्याबाबत माहिती जाणून घेतली. तसेच मध उद्योजक आणि अभ्यासक यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी संस्थेचे संचालक संजीव राय, खादी ग्राम उद्योगचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय हेडाव उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, “लघु उद्योगाच्या माध्यमातून कृषी उत्पादनाला चालना मिळावी, यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांतर्गत मस्त्य व्यवसाय, बांबू उत्पादन, मध उत्पादन, वनोत्पादन अशा विविध उत्पादन व्यवसायांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येत आहे. मध उत्पादकांना चालना मिळावी यासाठी सरकारने हनी क्लस्टर निर्मिती प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळत असल्यानेच हनी क्लस्टरच्या निधीत 10 टक्क्यांनी वाढ केली जाणार आहे.’
मधाचे आरोग्यदायी फायदे लक्षात घेत, प्रत्येक ठिकाणी साखरेबरोबरच मधदेखील उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. त्याचबरोबर मिठाई, बिस्किटे यामध्येही मधाचा वापर वाढवून मध उत्पादकांना शक्य ते प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.