विविधा : मुन्शी प्रेमचंद

माधव विद्वांस

हिंदी व उर्दू साहित्यातील नामवंत लेखक, आधुनिक हिंदी साहित्याचे जनक मुन्शी प्रेमचंद्र यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील लम्ही (जिल्हा पांडेपूर) येथे 31 जुलै, 1880 रोजी झाला. त्यांचे मूळ नाव धनपतराय श्रीवास्तव. त्यांना उपन्यास सम्राट म्हणूनही ओळखले जाते.
ते सात वर्षांचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या आजीने त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतली. त्यांच्या आजीचेही निधन झाले व ते पोरके झाले. कारण त्यांच्या वडिलांनी दुसरा विवाह केला व सावत्र आई नीट सांभाळत नव्हती. तशातही त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले. ते उर्दू मदरशामध्येच शिकले. लहानपणापासूनच त्यांना वाचनाची आवड होती. त्यांनी एका पुस्तकाच्या दुकानात नोकरी केली. तेथे त्यांना अनेक पुस्तके वाचण्यास मिळाली. त्यामुळे त्यांच्यातील लेखक जागा होऊ लागला.

प्रेमचंदांच्या लहानपणी, भारतामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक परिस्थिती बदलत होती आणि ब्रिटिश शासन आणि साम्राज्यवाद या विरोधी वातारण तयार होऊ लागले होते. त्याचा परिणाम प्रेमचंद यांच्या लेखनावर होणे साहजिकच होते. त्यांचा “ऑलिव्हर क्रॅमवेल’ हा पहिला लेख उर्दूमधून 1 मे, 1909 रोजी बनारस येथे उर्दू साप्ताहिक “व्हॉइस-ई-खल’ मध्ये प्रसिद्ध झाला.

त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ते शिक्षण खात्यामध्ये रूजू झाले. सरकारी नोकरीत असल्यामुळे त्यांनी “नबाबराय’ या टोपणनावाने लिहायला सुरुवात केली. त्यांच्या आईचे नाव आनंदी. त्यांच्या “बडे घरकी बेटी’ या कथेच्या नायिकेचे नावही आनंदी असून तिच्या व्यक्‍तिरेखेवर प्रेमचंदांच्या आईचा प्रभाव असावा. वर्ष 1909 मध्ये “सोजे वतन’ हा उर्दू कथासंग्रह त्यातील प्रखर राष्ट्रीय भावनांमुळे सरकारने जप्त केला. 

त्यानंतर त्यांनी “नबाबराय’ हे नावही सोडून दिले. त्यांचे मित्र दयानारायण निगम यांच्या सूचनेवरून त्यांनी नंतर “प्रेमचंद’ या नावाने लेखन सुरू केले. त्यांच्या साहित्यसंपदेमध्ये 15 कादंबऱ्या व 300 कथा आहेत. त्यांचे 24 कथासंग्रह प्रसिद्ध झाले. प्रेमचंद यांच्या कथांवर आधारित गरीब मजदूर, हीरा मोती, सेवासदन, गबन, शतरंज के खिलाडी हे चित्रपट निर्माण झाले.त्यांच्या लेखनामध्ये समाजातील सामान्य कुटूंबव्यवस्थेचे व सामाजिक परिस्थितीचे दर्शन होते. त्यामुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय झाले.नियतकालिकांमधील त्यांच्या लेखनाला प्रसिद्धी मिळाली.

त्यांच्या “गबन’ या कादंबरीमध्ये मध्यमवर्गीय माणसाच्या स्वभावाचे उत्कृष्ट चित्रण केले आहे. पोलीस खात्याच्या कचाट्यात सापडलेल्या एका दुर्बल माणसाचा निर्दयपणे कसा उपयोग करून घेतला जातो, याचे मोठे प्रभावी चित्रण यात त्यांनी केले आहे. तसेच राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या आकांक्षेने प्रेरित झालेल्या सामान्य लोकांचेही सुरेख वर्णन आहे. 

प्रेमचंदांनी वर्ष 1913 ते वर्ष 1931 पर्यंत एकूण 224 कथा, 100 लेख आणि 18 कादंबऱ्या लिहिल्या. त्यांची पहिली कादंबरी “असरारे महाबिद’ उर्दू भाषेत होती. ती उर्दू साप्ताहिक “आवाज-ए-ख़ल्क’मध्ये 8 ऑक्‍टोबर 1903 पासून क्रमशः प्रसिद्ध झाली, तर त्यांची शेवटची कादंबरी “मंगलसूत्र’ अपुरी राहिली. प्रेमचंद यांच्या पत्नी शिवरानी देवी यांनी प्रेमचंदांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे चरित्र लिहिले. त्यांच्या कादंबऱ्या व कथांचे अनेक भाषांमधून भाषांतर झाले आहे. वाराणसी येथे 8 ऑक्‍टोबर, 1936 रोजी त्यांचे निधन झाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.