हांगझोऊ :- चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सामन्यादरम्यान हॉंगकॉंगच्या एका महिला खेळाडूचा महागडा मोबाईल हरवला. तब्बल दहा हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या मैदानावर स्वयंसेवकांनी प्रचंड शोधाशोध करत अखेर मोबाईल शोधून काढला व त्या खेळाडूच्या हवाली केला.
लियू तिआन असे या खेळाडूचे नाव असून, हा मोबाईल शोधण्यासाठी स्वयंसेवकांनी कचऱ्याच्या तब्बल 10 हजार पिशव्या शोधल्या. हा मोबाईल स्वीचऑफ होता, त्यामुळेच त्याचा शोध घेणे जिकिरीचे बनले होते.
लियू एक बुद्धिबळपटू असून, तिचा सामना सुरू होण्यापूर्वीच तिने मोबाईल बंद केला होता. मात्र, तिच्या बॅगमधून हा मोबाईल कधी व कुठे पडला हेच तिला आठवत नव्हते. स्वयंसेवकांनी हा मोबाईल शोधून दिल्याबद्दल तिने आभार व्यक्त केले.