नवी दिल्ली – चीनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या एका महिला मुष्टियुद्धपटूने डोपिंग केल्याचे समोर येत आहे. ही खेळाडू कोण ते अद्याप जाहीर करण्यात आले नसले तरी लवलिना बोर्गोहेन किंवा निखत झरीन यांच्यापैकीच एक असेल असा संशय व्यक्त केला जात आहे.
त्या स्पर्धेदरम्यान सर्व खेळाडूंची डोपींग टेस्ट करण्यात आली होती व त्यात भारताच्या एका महिला मुष्टीयुद्धपटूबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. लवलिना व निखतने या स्पर्धेत पदके मिळवताना आगामी पॅरिस ऑलिम्पिकचा कोटाही प्राप्त केला होता. आता ही दोषी खेळाडू समोर आली तर तिचे पदक तर काढून घेतलेच जाइल त्याचबरोबर तीचा ऑलिम्पिक कोटाही रद्द केला जाणार आहे. या दोघींसह अन्य दोन खेळाडूंवरही चाचणीत दोषी ठरण्याचा दावा केला जात आहे.
या स्पर्धेत भारताच्या या दोघींसह अन्य दोन महिला खेळाडूंनीही पदके मिळवली होती. ज्यांच्यावर हा संशय व्यक्त केला जात आहे त्या खेळाडूने जागतिक उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी समितीच्या (वाडा) वेअर टू नो या नियमाची पूर्तता केलेली नसल्याचेही सांगितले जात आहे. वाडाने मागितलेल्या माहितीत या खेळाडूने आपण स्पर्धेपूर्वी कुठे कुठे गेलो होतो तसेच कोणाला भेटलो होतो याबाबत काहीही माहिती दिलेली नाही, त्यामुळेच हा संशय घेतला जात आहे. तसेच या खेळाडूने डोपिंग विरोधी उपक्रमात सहभागही घेतलेला नव्हता असेही समोर आले आहे. येत्या काही दिवसांत या खेळाडूचे नाव जाहीर करण्यात येणार असून त्यानंतरच कारवाई काय होणार हे देखील जाहीर केले जाइल. लवलिना व निखतसह जस्मिन लंबोरिया व नितु घांगस या अन्य दोन खेळाडूंनीही पदके मिळवलेली आहेत.
भारतीय महासंघाने वृत्त फेटाळले
भारताच्या एकाही खेळाडूने या स्पर्धेदरम्यान किंवा पूर्वी उत्तेजक सेवन केलेले नाही. वाडाने केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. वेअर टू नो बाबत आम्ही स्पष्टीकरण देणार आहोत तसेच ज्या खेळाडूंची माहिती त्याना हवी आहे ती देखील पुरवली जाईल. मात्र, चाचणीचा अहवाल येइपर्यंत असे आरोप करणे अयोग्य असल्याचे मत भारतीय मुष्टीयुद्ध महासंघाने म्हटले असून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत.