पुणे: करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमधून प्रतिबंधित भाग वगळता शहरातील अन्य भागातील निर्बंध काही प्रमाणात कमी करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात किरकोळ हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
एरंडवणे भागातील गणेशनगर परिसरात दोन दिवसांपूर्वी रात्री आठच्या सुमारास शुभम काळे (वय 21) याला टोळक्याने बेदम मारहाण केली. याप्रकरणी आठ ते नऊजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकमेकांकडे बघण्याच्या वादातून मारहाण झाल्याची काळेने तक्रारीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक सूरज गोरे तपास करत आहेत. सिंहगगड रस्ता भागात वडगाव बुद्रुक येथे दुचाकीस्वार युवक आणि त्याच्या मित्रावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत आशुतोष जाधव (वय 20, रा.चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक) आणि रवींद्र खारगे जखमी झाले आहेत.
जाधवने याबाबत सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार जाधव, खारगे दोन दिवसांपूर्वी रात्री साडेआठच्या सुमारास वडगाव बुद्रुक भागातून जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्यांना अडवले. चौघांनी जाधव, खारगे यांना लोखंडी गजाने मारहाण केली तसेच त्यांच्यावर कोयत्याने वार केले.पोलीस हवालदार पी. एस. साळुंखे तपास करत आहेत.
उत्तमनगर भागातील खडकवाडी भागात राजकीय वादातून दोन गटात मारामारी झाल्याची घटना घडली.याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत. संतोष गणपत तागुंदे (वय 43,रा.खडकवाडी, ता. हवेली) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महेश प्रभाकर खडके (वय 29) याला अटक करण्यात आली. दरम्यान, सीताबाई रामचंद्र तागुंदे (वय 50,रा.खडकवाडी, ता.हवेली) यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चौघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणातील तक्रारदार आणि आरोपी यांच्यात राजकीय वाद आहे. वादातून त्यांच्यात मारामारी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, बिबवेवाडी भागातील ओटा परिसरात किरकोळ वादातून मोटार, टेम्पो, रिक्षाच्या काचा फोडण्याची घटना घडली. याप्रकरणी टोळक्याविरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश कदम (वय 36,रा. ओटा परिसर, बिबवेवाडी) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली. टोळक्याने कदम यांच्या मोटारीसह या भागातील रहिवासी इब्राहिम काझी, गौरव गुजर यांच्या वाहनांच्या काचा फोडल्या.