पुणे (प्रतिनिधी): करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेजअंतर्गत विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह पाच किलो मोफत तांदूळ वितरण करण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत शिधापत्रिका नसलेल्या राज्यातील 70 लक्ष 1 हजार 638 गरीब व गरजू नागरिकांना लाभ मिळणार असून यासाठी 35 हजार मेट्रिक टन तांदळाचे नियतन दरमहा करावे लागणार आहे.
देशातील करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांसाठी माहे एप्रिल ते जून, 2020 या कालावधीसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत तसेच एपील शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या एपील (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे मे व जून , 2020 या दोन महिन्याच्या कालावधीत सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ देण्यात आला आहे.
तथापि, याआतापर्यंत रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना अन्नधान्याचा लाभ देण्यात आला नव्हता. रेशनकार्ड नसलेले बेघर, स्थलांतरित, कामगार व अडकून पडलेल्या गरीब आणि गरजू नागरिकांना धान्य मिळण्यासाठीराज्य सरकारने केंद्र सरकारकडे मागणी केली होती.याची दखल घेत, केंद्र शासनाकडून रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत तांदूळ देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.