65 हजार पर्यटकांची कासला भेट, फुलांचे सौंदर्य पाहण्यासाठी जांभा दगडाच्या पायवाटा
सातारा – पावसाची उघडीप मिळाल्यामुळे कास पठारावरील फुलोत्सव बहरात असून वन विभागाच्या मिनीबस टूरलासुद्धा पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पठारावर फुलांची नासधूस होऊ नये, म्हणून वन विभागाने सहा ठिकाणी जांभा दगडाच्या पायवाटा तयार केल्या आहेत.
गेल्या तीन आठवडयांत तब्बल 65 हजार पर्यटकांनी कास पठाराला भेट दिल्याची माहिती सातारा विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल राठोड यांनी दिली. यंदाचा कास पठाराचा फुलोत्सव परतीचा पाऊस ऊशीरा झाल्याने अकरा दिवस विलंबाने सुरू झाला. मात्र, अरबी समुद्रातील चक्रीवादळाच्या द्रोणीय स्थितीमुळे पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा तडाखा सुरूच असून सातारा जिल्ह्यातही तशीच परिस्थिती आहे.
पावसाच्या उघडीपीचा अंदाज घेत पर्यटक कासच्या फुलोत्सवाचा आनंद घेत असून सारे पठार पर्यटकांनी भरून जात आहे. तारेच्या कुंपणातून थेट फुलांमध्ये पर्यटक जाताना फुलांची नासधूस होत होती. मात्र यंदा त्यात वनविभागाने सुखद बदल करत पठारावर व कुमुदिनी तलावाच्या आसपास फुलांच्या बाजूने चकाचक जांभा दगडाच्या पायवाटा तयार केल्या आहेत. यामुळे पर्यटकांना सुरक्षित अंतरावरून फुलांचा आनंद घेणे शक्य झाले आहे.
या उपक्रमासाठी वन विभागाला साडेसात लाख रुपयांचा खर्च आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या कुमुदिनी तलाव परिसरात पिवळी फुले मोठया प्रमाणावर फुलल्याने संपूर्ण पठार पिवळे धमक झाले आहे. गेल्या आठ दिवसांत पुणे, मुंबई, नाशिक, नगर, अलिबाग येथून सुमारे साठ हजार पर्यटकांनी कास पठाराला भेट दिली. गेल्या शनिवारी व रविवारी या दोन दिवसांत ऑनलाईन व ऑफलाईन अशा साडेपाच हजार पर्यटकांनी कासच्या वातावरणाचा आनंद लुटला.