आता आमच्या सगळ्यांचं ठरलंय…

हर्षवर्धन पाटील यांना अप्पासाहेब जगदाळे यांनी दिला पाठिंबा

रेडा – इंदापूर तालुक्‍यातील पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी व आगामी सरकार भाजपचेच येणार असल्याने इंदापूर विधानसभेचे महायुतीचे भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना जाहीर पाठिंबा देत आहे. आता आमच्या सगळ्यांचं ठरलंय कमळाला मतदान करायचं, असे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी जाहीर केले.

इंदापूर बाजार समितीच्या प्रांगणात अप्पासाहेब जगदाळे यांनी आयोजित केलेल्या “आश्‍वासन नको, शब्द हवा’ या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब घोलप, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोक घोगरे, संजय निंबाळकर, विजय निंबाळकर, काकासाहेब वाबळे, इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, भाजपचे तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, उदयसिंह पाटील, पृथ्वीराज जाचक, कृष्णाजी यादव, प्रदीप जगदाळे, माऊली वाघमोडे, दीपक जाधव, विलास वाघमोडे, अमोलराजे इंगळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अप्पासाहेब जगदाळे म्हणाले की, मला शेतकऱ्यांच्या हितासाठी इंदापूर तालुक्‍यात पाणी हवे असल्याने एकूण 14 मागण्या पूर्ण करण्यासाठी मला उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला. खरे तर राष्ट्रवादीने मला उमेदवारी दिली पाहिजे होती; मात्र मला उमेदवारी दिलेली नाही. जरी उमेदवारी दिली नाही तरीदेखील माझ्या सार्वजनिक मागण्यांचा विचार करायला हवा होता; परंतु राष्ट्रवादीच्या उमेदवाराने एक फोन देखील केला नाही व या संदर्भात कोणतीही माझ्याशी चर्चा केली नाही, त्यामुळे मी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच विजयसिंह मोहिते पाटील यांच्याबरोबर यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. जर मला समोरच्या उमेदवाराने चर्चेसाठी फोन केला असता तर माझी चर्चा करण्याची तयारी होती, असे आमदार भरणे यांचे नाव न घेता जगदाळे यांनी जाहीर बोलून दाखवले.

आम्ही जात म्हणून पाठिंबा दिलेला नाही
मला खंत वाटते, मी तिकीट मागितले की जात पुढे येते. जर कार्यकर्त्यांना घेऊन बैठक घेतली तर समाजाचा विषय पुढे आणला जातो. मी तर 2014 मध्ये जात-पात न बघता आमदार भरणे यांना निवडून येण्यासाठी मोलाची मदत केली. माझ्याकडे सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हितासाठी पाठिंबा दिला असून, जात म्हणून हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा दिलेला नाही, असे अप्पासाहेब जगदाळे यांनी नमूद केले.

इंदापूर तालुक्‍यात परिवर्तन घडवण्यासाठी बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा देत साथ दिली आहे. त्यामुळे उद्याच्या विजयाचे शिल्पकार अप्पासाहेब जगदाळे यांच्यासह भाजपचे सर्व कार्यकर्ते असतील.
– हर्षवर्धन पाटील, महायुतीचे उमेदवार, इंदापूर विधानसभा मतदारसंघ

Leave A Reply

Your email address will not be published.