लोणीकाळभोर -कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतींच्या हद्दीतील उसाच्या गुऱ्हाळाची मशीन चोरुन नेणाऱ्या चोरट्यांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधाराने गुन्हे शोध पथकाने तातडीने जेरबंद करून त्यांच्याकडून पावणेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी कमलेश संजय काळे (वय 22, रा. बोरीभडक, ता. दौंड) आणि अर्जुन चिंरजीव प्रजापती (वय 21, सध्या रा. बोरीभडक, ता. दौंड; मूळ राज्य उत्तर प्रदेश) या दोघांना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी हरिश्चंद्र फडतरे यांचे संभाजीनगर येथील उसाच्या रसाचे मशीन अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. या प्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर, हवालदार समीर चमनशेख, नितीन गायकवाड, विजय गाले, सागर कडूू, रोहिदास पारखे या पोलीस पथकाला चोरीचा तपास करण्याचे आदेश दिले होते.
संशयास्पद दुचाकींचे क्रमांक काढून, मालकांचे नाव-पत्ते शोधून त्यांच्या फेसबुक अकौंटवरील फोटो काढून, त्यांची माहिती शोधलीण हे दोघे यवत (ता. दौंड) पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्याचे समजले. त्यांना शिताफीने ताब्यात घेऊन तपास केला.
या दोघांनी गुन्हा कबूल केला आहे. गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन छोटा टेम्पो व त्यांनी गुन्ह्यातील चोरून नेलेली उसाच्या रसाचे मशीन असा एकूण 5 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.