भाकीत : पंधरा तारखेला नेमकं काय होणार?

चौदा एप्रिलनंतर काय होणार? लॉकडाउन संपणार की वाढणार? की टप्प्याटप्प्यानं सवलत मिळणार? संसर्गित भागांत लॉकडाउन जारी ठेवून इतरत्र तो शिथील केला जाणार का? ज्या भागांत करोनाचे रुग्ण नाहीत, तिथं काही प्रमाणात शिथीलता दिली जावी, अशी मागणी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलीय.

जिल्ह्याच्या एकंदर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते म्हणाले, चौदा तारखेनंतर घरात राहण्याच्या मनस्थितीत लोक नाहीत. अर्थात, हे आपलं वैयक्‍तिक मत आहे आणि अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, हेही त्यांनी सांगून टाकलं. लोक घरात बसून कंटाळले असणं स्वाभाविक आहे. काही जणांची मनस्थिती बिघडल्याचीही उदाहरणं समोर आहेत. पण करोनाच्या संकटाची एकंदर व्याप्ती आणि इतर देशांमधील अनुभव पाहता धैर्य आणि संयम ही दोनच महत्त्वाची शस्त्रं आपल्याजवळ आहेत.

करोनावर ना ठोस उपचारपद्धती विकसित झालीय ना लस. त्यामुळे उद्याचा दिवस पाहायचा असेल तर आज संयम राखला पाहिजे, हे वाक्‍य पुढील आदेश येईपर्यंत रोज सकाळी म्हणण्यावाचून पर्याय नाही. पण खरं तर “घरात बसावं लागतंय,’ याऐवजी “घरात बसायला मिळतंय,’ असा विचार केला तर? स्वतःची आणि कुटुंबीयांची मानसिक स्थिती चांगली राखणं, हे आव्हान मानायचं की संधी? “आज कामावर दांडी मारण्याची इच्छा झालीय,’ असं रोज म्हटलं तर मनस्थितीत काही फरक पडेल का?
स्वतःच्या मानसिकतेवर असे प्रयोग करायला सांगणं खूप सोपं आहे; पण प्रत्यक्षात ते करणं खूप अवघड आहे, हे आम्हाला कबूल आहे. पण अशा काळात प्रायोगिकताच उपयोगी पडते, हे काही अनुभवांवरून सांगता येईल. रोजचा पेपर कधी वाचून होतो हे हल्ली कळतसुद्धा नाही. पण वाचलं नाही असं काहीच उरता कामा नये, या हट्टानं आम्ही राशीभविष्यसुद्धा वाचायला सुरुवात केली. या शास्त्राबद्दल आम्ही टोटल अज्ञानी असल्यामुळे त्या वाटेला सहसा कधी जात नाही. पण सहज म्हणून किंवा स्वतःत बदल घडवायचा म्हणून वाचू लागलो. “नोकरीत वरिष्ठांशी मतभेदांची शक्‍यता,’ हे भाकित पहिल्याच दिवशी वाचायला मिळालं.

दुसऱ्या दिवशी आमच्या राशीला “नवीन घरखरेदीचा प्रबळ योग’ होता. तिसऱ्या दिवशी “मित्रांबरोबर सहलीला जाण्याचा’ तर चौथ्या दिवशी “सोने खरेदीचा’ योग होता. “घरी पाहुणे येतील,’ असं सहाव्या दिवशी वाचायला मिळालं. लॉकडाउनच्या कालावधीतील यापैकी एकही गोष्ट घडणं शक्‍य नव्हतं. परंतु सामान्य स्थिती लक्षात घेऊन हे लिहिलं जात असावं, असं समजून चिकाटीनं वाचतच राहिलो. हळूहळू वरील गोष्टी कमी झाल्या आणि “कुटुंबाबरोबर महत्त्वाच्या विषयावर चर्चा कराल,’ वगैरे वाक्‍यं वाचण्यात येऊ लागली.

कधी जोडीदाराला कामात मदत करण्याचा सल्ला, कधी व्यवसायाची चिंता वाटेल असं भाकित, कधी मानसिक ताण वाढण्याची शक्‍यता, कधी ज्येष्ठांची काळजी घेण्याचा तर कधी ज्वलनशील वस्तूंपासून दूर राहण्याचा सल्ला… हळूहळू आमचं भविष्यही चार भिंतीत बंदिस्त होतंय, असा अनुभव येऊ लागला. मानसिक दडपणापासून दूर राहण्याचा उपयुक्‍त उपदेश मिळू लागला. अफवांवर विश्‍वास ठेवू नका, असा इशारा तर खूपच महत्त्वाचा! आता पंधरा तारखेला नेमकं काय सांगितलं जातं, याकडे डोळे लागलेत.

अबाऊट टर्न : हिमांशू

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.