पुणे -“ईडी नोटीस आणि इतर गोष्टींमुळे नेत्यांना त्रास दिला जात आहे, त्यावरूनच भाजपकडून हा सत्तेच्या गैरवापर कसा होतो आहे हे दिसून येते. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या 10 नेत्यांची तपास यंत्रणाकडून चौकशी करण्यात आली आहे. राज्यात तपास यंत्रणांचा
गैरवापर सुरू असून हा गैरवापर कसा होतोय, हे जनतेने पाहिले आहे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील यांना ईडीकडून चौकशीला बोलवल्यानंतर विरोधकांकडून आता सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यावरूनच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही टीका केली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना नाहक तुरुंगवास घडला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात कितीतरी तक्रारी दाखल आहेत. त्याची यंत्रणांनी नोंद घ्यावी, असेही पवार यांनी म्हटले. माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची सीबीआयने चौकशी सुरू केल्यानंतर नवाब मलिक यांनी घेतलेली भूमिका सत्यावर आधारित होती. समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपांची किंमत मलिकांना चुकवावी लागली असल्याचेही ते म्हणाले.
…हा लहरी माणसाचा निर्णय
एखाद्या लहरी माणसाने निर्णय घ्यावा तसा दोन हजार रुपये नोटबंदीचा घेतला गेला आहे. मागे अशाच प्रकारचा निर्णय घेतला तर त्यात खूप लोकांचे नुकसान झाले. अनेकांनी आत्महत्या केल्या. अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली होती. आता दोन हजारच्या नोटीबंदीचा निर्णयाचा पुढे काय होते, ते पाहूया, अशा शब्दांत पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
महाविकास आघाडी एकत्रित लढणार
कर्नाटक निवडणुकीच्या निकालामुळे राज्यातील निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत कोणतीच चर्चा झाली नाही. आगामी निवडणुका एकत्रपणे लढवायच्या यावर एकमत झाले आहे. तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन सदस्य जागा वाटपांबाबत चर्चा करणार आहेत. त्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यास उद्धव ठाकरे, मी आणि मल्लिकार्जुन खर्गे अथवा सोनिया गांधी हे निर्णय घेतील, असे पवारांनी सांगितले.