स्थलांतरित आणि मतदान (भाग-२)

नोकरी, व्यवसायानिमित्त एका राज्यातून दुसऱ्या राज्यात असंख्य नागरिक स्थलांतरित होतात; परंतु अशा नागरिकांमध्ये मतदानाबद्दल अनास्था दिसून येते. अनेकांना तर स्थलांतरित झाल्यानंतर नव्या शहरातील मतदारयादीत आपले नाव कसे नोंदवायचे ही प्रक्रियाही माहीत नसते. यासंदर्भात उद्‌बोधन करणे हा मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या मोहिमेचा भाग का मानला जात नाही?

स्थलांतरित आणि मतदान (भाग-१)

अहवालात असा अंदाज बांधण्यात आला आहे की, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, राजस्थान आणि जम्मू-काश्‍मीर यांसारख्या राज्यांमधील मतदानाच्या टक्केवारीत झालेली घट हा तेथून मोठ्या प्रमाणावर झालेल्या स्थलांतरांचा परिपाक आहे. सात टप्प्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या मतदानाचे चार टप्पे पार पडले आहेत. यानंतर 6 मे, 12 मे आणि 19 मे रोजी ठिकठिकाणी मतदान होणार आहे. आतापर्यंत सर्वाधिक मतदान तिसऱ्या टप्प्यात झाले आहे. अनेक ठिकाणी मतदारांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता, तर अनेक ठिकाणी निराशाजनक स्थिती होती. परंतु यामुळे जो असमतोल निर्माण होतो, त्याचे उदाहरण पाहण्याजोगे आहे.

आसामात लोकसभेच्या 14 जागा आहेत तर गुजरातमध्ये 26 जागा आहेत. या दृष्टिकोनातून लोकशाही निवडणुकीवर गुजरातचा होणारा परिणाम आसामच्या तुलनेत अधिक मानला जातो; परंतु आसाममध्ये 80 टक्के मतदान झाले आहे. औद्योगिक, आर्थिक आणि रोजगाराच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या गुजरातमध्ये मात्र 64 टक्के मतदान झाले आहे. अनेक तज्ज्ञ या मुद्द्याकडे साक्षरता, शिक्षण आणि जागरूकता या दृष्टिकोनातून पाहतात. हे योग्यही आहे. मतदानाची टक्केवारी हेच राजकीय जागरूकतेचे परिमाण मानले गेले पाहिजे. कोणत्या क्षेत्रात किती टक्के मतदान झाले, यावरून त्या-त्या भागातील राजकीय जागरूकतेचा अंदाज बांधता येतो.

परंतु परिस्थिती वेगळीच आहे. देशाला अनेक पंतप्रधान देणाऱ्या आणि राजकीय उलथापालथ घडवून आणण्याची क्षमता असणाऱ्या उत्तर प्रदेशातसुद्धा आजवर 80 टक्के मतदान झालेले नाही. मतदानाच्या टक्केवारीत पाहायला मिळणारी घट हा स्थलांतरित लोकांमध्ये जागरूकतेच्या असलेल्या अभावाचा परिणाम होय. अशा परिस्थितीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी भारताने अमेरिकेचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवायला हवे. अमेरिकेत जर एखादा नागरिक परदेशात राहात असेल, तर तो अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून मतदान करू शकतो. आपल्याकडे मतदानासाठी इलेक्‍ट्रॉनिक यंत्रे आली, व्हीव्हीपॅट यंत्रेही आली. मात्र, मोठ्या प्रमाणावर देशात जे स्थलांतर होते, त्याचा मतदानावर इतका ठळक परिणाम होत असतानासुद्धा या बाबतीत काहीही प्रयत्न झालेले नाहीत, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.

– विश्‍वास सरदेशमुख

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.