कायद्याचा सल्ला

प्रश्‍न – आजकाल मोबाइल, इंटरनेटच्या वापरामुळे बरेच फसवणुकीचे, बदनामी करण्याचे व खोटे मजकूर पाठविण्याचे प्रकार होत आहेत. असा प्रकार घडल्यास पीडित व्यक्तीला कुठे व कशी दाद मागता येते व त्यासाठी कायद्यामध्ये कुठल्या तरतुदी आहेत?
उत्तर – संगणक, मोबाइल व इंटरनेटच्या वापराबाबत होत असणाऱ्या गैरप्रकाराला आळा बसावा, पीडित व्यक्तीला न्याय मिळावा व अशा आरोपी व्यक्तींना कायद्याचा धाक वाटावा म्हणून सरकारने “माहिती व तंत्रज्ञान कायदा’ सन 2011 मध्ये अंमलात आणला आहे. सदर कायद्याच्या चॅप्टर 11 गुन्हा होत असणाऱ्या त्रुटीबाबत कलम 65 ते 78 मध्ये कुठल्या कुठल्या कृतीतून गुन्हा होत असतो याबाबत तरतुदी केल्या आहेत व याबाबत गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्यास किती रकमेचा दंड व कारावासाची शिक्षा होऊ शकते अशी तरतूद आहे. अशाप्रकारचा गुन्हा झाल्यानंतर पीडित व्यक्तीने गुन्हा घडला आहे तेथील पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवावा अथवा त्याबाबत लेखी तक्रार अर्ज करावा या तक्रारीची प्रत कमिशन ऑफ पोलीस यांचे सायबर गुन्ह्याचे कक्षामध्ये देखील पाठविणे आवश्‍यक आहे. सदर अथवा इतर कुठल्याही गुन्ह्याची माहिती आता ऑन लाईन माध्यमातून देखील करता येते. अशा प्रकारची फिर्याद आल्यानंतर संबंधित पोलीस अधिकारी यांची दखल घेऊन प्रथम माहिती अहवाल (एफ.आय.आर.) तयार करतात व त्या अनुषंगाने त्या प्रकरणाचा तपास करतात व गुन्हा करणाऱ्या व्यक्तीस अटक करून पुढील कारवाई करतात. अशाप्रकारच्या गुन्ह्यामध्ये पोलीस भारतीय दंड विधान या कायद्यामधील अपराधाची कलमे देखील प्रथम माहिती अहवालामध्ये टाकतात व तपास पूर्ण झाल्यानंतर पोलीस तपास अधिकारी दोषारोप पत्र मे. कोर्टामध्ये दाखल करतात. त्यानंतर याबाबतची केस कोर्टामध्ये पाठविली जाते व आरोपीचे विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यावर त्याला दंड व शिक्षा होऊ शकते. प्रत्येक व्यक्तीने अशा रितीने संगणक, इंटरनेट व मोबाइल वापरताना खबरदारी घेणे आवश्‍यक आहे.

प्रश्‍न – जर कुठल्याही बॅंकेमध्ये एखाद्या व्यक्तीने ठेव ठेवली असेल तर रक्कम रु. 1,00,000/- पर्यंतचे ठेवीसाठी विमा उतरविला जातो व ती रक्कम सुरक्षित राहू शकते व बॅंकेमध्ये काही घोटाळा झाला अथवा अडचण आली तर ती रक्कम ठेवीदारास मिळण्यास अडचण येत नाही; परंतु ठेवीदाराची ठेवीची रक्कम रु. 1,00,000/- पेक्षा जास्त असेल तर त्या ठेवीदारास रक्कम रु. 1,00,000/- चे वरची रक्कम मिळू शकते का? ठेवीदारास उर्वरित रक्कम न मिळाल्यास त्याला ती रक्कम मिळण्यास काय कायदेशीर मार्ग आहेत?
उत्तर – प्रथमतः कुठल्याही ठेवीदाराने त्याची रक्कम कुठल्याही बॅंकेमध्ये ठेव म्हणून ठेवण्यापूर्वी त्या बॅंकेची चौकशी व पत बघणे आवश्‍यक आहे. ठेव ठेवण्याचे वेळी ठेव एका नावाने न ठेवता घरातील जवळच्या व्यक्तीच्या नावावर वेगवेगळी अशी प्रत्येकी रक्कम रु. 1,00,000/- अशी ठेवावी, तसे शक्‍य नसेल आणि जर एखाद्या व्यक्तीने रक्कम रु. 1,00,000/- जास्त रक्कम ठेवली तरी कुठलाही धोका होत नसतो, बॅंक म्हणजे समाजाच्या रकमेच्या विश्‍वस्त असतात. जर बॅंकेने ठेवीदाराची रक्कम देण्यास टाळाटाळ केली तर ठेवीदाराने त्याबाबत संबंधित बॅंकेस वकिलामार्फत नोटीस पाठवून त्या रकमेची मागणी करावी व या नोटिसीची प्रत माहिती व कारवाईसाठी रिझर्व्ह बॅंकेस पाठवावी. जर नोटीस पाठवून ठेवीदारास रक्कम मिळाली नाही तर त्याबाबत ठेवीदारास ग्राहक मंचाकडे किंवा दिवाणी कोर्टामध्ये जाऊन तक्रार अर्ज अथवा दावा करता येतो व ती रक्कम वसूल करता येते.

प्रश्‍न – कुठल्याही एखाद्या व्यक्तीचे नाव 7/12 च्या उताऱ्यावर आले अथवा सिटी सर्व्हेच्या उताऱ्यावर आले म्हणून तो कायद्याने त्या मिळकतीचा खरा मालक आहे असे समजता येते का? कुठल्याही मिळकतीचे खरेदीखत करताना कुठली कागदपत्रे मालकी तपासण्यासाठी बघणे आवश्‍यक असते? एकदा खरेदी झाले की त्याला भविष्यामध्ये हरकत घेतली जाऊ शकते का?
उत्तर – कुठल्याही व्यक्तीचे नाव केवळ 7/12 वर उताऱ्यावर आले किंवा सिटी सर्व्हेच्या उताऱ्यावर आले म्हणून तो त्या मिळकतीचा खरा व कायदेशीर मालक आहे असे सिद्ध होत नाही. कुठलीही मिळकत खरेदी करताना त्यांचे मालकीबाबत सत्यता व खात्री करून घेणे कधीही आवश्‍यक असते. खरेदीखत करताना ती मिळकत त्या मालकाकडे कशी मालकीने आली आहे याची सत्यता पडताळण्यासाठी त्या मिळकतीचे 30 वर्षांचे 7/12 चे उतारे, सिटी सर्व्हेचे उतारे, फेरफार व एस. आय. फाईल, खरेदीखत, सूची क्र. 2 इत्यादी बघणे आवश्‍यक असते. त्यामुळे मिळकत खरेदीखत करताना त्या मिळकतीचा शोध अहवाल व त्याबाबत दैनिक पेपरमध्ये जाहीर नोटीस देऊन त्या खरेदीमालकाचे व्यवहारास हरकत मागविणे या दोन गोष्टी महत्त्वाचे असतात. त्याचप्रमाणे खरेदीखत करत असलेल्या मिळकतीचा ताबा कुणाकडे आहे हे देखील बघणे आवश्‍यक असते, तसेच या मिळकतीबाबत मिळकत मालकाने पूर्वी कुठलाही गहाण, दान, लीज, लीन, भाडेकरार, साठेखत करार केला असल्यास त्याबाबत हरकत जाहीर नोटिसीचे उत्तरामधून स्पष्ट होत असते. त्यामुळे मिळकत खरेदी करताना त्या मिळकतीचा शोध अहवाल व जाहीर नोटीस देऊनच मिळकत खरेदी करणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे खरेदीखतामध्ये मिळकत विकणाऱ्या माणसांचे मालकीबाबत सविस्तर माहिती लिहिणे आवश्‍यक असते. कुठलेही खरेदीखत हे भविष्यामध्ये त्यातील मालकीचे वादाबाबत अथवा इतर हक्काबाबतचे मागणीबाबत हरकत घेऊन रद्द करून मागता येऊ शकते. त्यामुळे मिळकत खरेदी करताना ती मिळकत खरेदी करणाऱ्याने वरीलप्रमाणे दक्षता घ्यावी व खरेदीखतामध्ये अशाप्रकारची हरकत आल्यास त्याचे खर्चासह निवारण करण्याची जबाबदारी मिळकत विकत देणाऱ्या माणसांवर टाकणे गरजेचे असते.

प्रश्‍न – माझेकडून एका व्यक्तीने रक्कम रु. 1,00,000/- घेतले व त्याबाबत मला त्याचा रक्कम रु. 1,00,000/- धनादेश दिला. सदर धनादेश मी बॅंकेमध्ये भरला असता तो न वटता परत आला व त्याबाबत माझे बॅंकेने हा धनादेश त्या व्यक्तीचे खात्याचा नसून त्यांचे मयत सासूचे खात्याचा आहे असे कळविले. या धनादेशावर सही माझेकडून रक्कम घेणाऱ्या इसमाची आहे, तरी याबाबत मी काय कारवाई करावी.
उत्तर – या प्रकरणामध्ये आपल्याकडून रक्कम रु. 1,00,000/- घेणाऱ्या इसमाने आपली घोर फसवणूक व विश्‍वासघात केला आहे व आपणास खोटा धनादेश देऊन बनावट कागदपत्रे केल्याचा गुन्हादेखील केला आहे. याबाबत आपण गुन्हा घडलेल्या ठिकाणाचे संबंधित पोलीस स्टेशनला फिर्याद द्यावी अथवा लेखी तक्रार अर्ज द्यावा तसेच आपण या प्रकाराबाबत व रक्कम घेणाऱ्या इसमास आपले वकिलांकडून कायदेशीर नोटीस द्यावी. आपणास आपली रक्कम परत न मिळाल्यास आपण ही रक्कम वसूल होण्यासाठी दिवाणी दावा करावा. आपणास ही रक्कम वसूल करण्यासाठी मे. कोर्टाकडून हुकुमनामा मिळेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.