पंजाब – भारतीय वायुदलाचे मिग-29 फायटर विमान शुक्रवारी दुर्घटनाग्रस्त झाले. हे विमान पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यामध्ये कोसळल्याने ही दुर्घटना घडली. या फायटर विमानाने जालंधरमधील आदमपूर एअर फोर्सच्या बेसवरुन नियमित सरावासाठी उड्डाण केले होते.
हे विमान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सकाळी अकरा वाजेच्या सुमारास चुहारपुर गावात कोसळले. या जमिनीवर आदळताच या विमानाने पेट घेतला. सुदैवाने मिग-29 चा वैमानिक सुखरुप आहे. अपघातापूर्वी वेळीच बाहेर पडल्याने या वैमानिकाचे प्राण बचावले. एअर फोर्सने दिलेल्या माहितीनुसार, या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
मिग-29 हे रशियन बनावटीचे विमान असून 1999 साली कारगिल युद्धात शत्रूच्या तळांवर हल्ला करण्यासाठी या विमानांचा वापर करण्यात आला होता. एअरफोर्सकडे 60 पेक्षा जास्त मिग-29 विमाने आहेत. अत्याधुनिक सिस्टिम आणि शस्त्रास्त्रांनी ही विमाने सुसज्ज आहेत. मल्टीरोल म्हणजेच बहुउद्देशीय प्रकारामध्ये ही फायटर विमाने मोडतात. एअर टू एअर आणि एअर टू ग्राऊंड अशा दोन्ही मिशन्ससाठी ही विमाने उपयुक्त आहेत.