गोवा – गोव्यामध्ये होणाऱ्या 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रख्यात हॉलिवुड अभिनेते आणि निर्माते मायकेल डग्लस यांना प्रतिष्ठेचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारणमंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी “एक्स’वरच्या पोस्टमध्ये ही घोषणा केली आहे.
“इफ्फी’मध्ये मायकेल डग्लस यांची पत्नी म्हणजे नामवंत अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ती कॅथरिन झिटा जोन्स, त्यांचा मुलगा अभिनेता डायलन डग्लस हे देखील उपस्थित राहणार आहेत. भारतामध्ये मायकेल डग्लस यांची लोकप्रियता सर्वश्रृत आहे आणि आमचा देश आपली समृद्ध सिनेमॅटिक संस्कृती आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरा यांचे दर्शन घडवण्यासाठी उत्सुक आहे, असे ठाकूर यांनी सांगितले.
चित्रपट जगतातील दिग्गज म्हणून मायकेल डग्लस यांची ओळख आहे. आपल्या अतुलनीय प्रतिभेने आणि कलेशी असलेल्या बांधिलकीने त्यांनी जगभरातील प्रेक्षकांना मोहित केले आहे. मायकेल डग्लस यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. यात दोन अकादमी पुरस्कार, पाच गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि एक एमी पुरस्कार यांचा यात समावेश आहे.
वॉल स्ट्रीट (1987), बेसिक इन्स्टिंक्ट (1992), फॉलिंग डाउन (1993), द अमेरिकन प्रेसिडेंट (1995), ट्रॅफिक (2000) आणि बिहाइंड द कॅंडलब्रा (2013) यांसारख्या दर्जेदार चित्रपटांनी सिनेरसिक आणि चित्रपट जगतात आपला अमीट ठसा उमटवला आहे. समीक्षकांनी गौरवलेल्या वन फ्लू ओव्हर द कुक्कूज नेस्ट (1975), द चायना सिंड्रोम (1979), आणि द गेम (1999) यांसारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे.
1998 मध्ये, अण्वस्त्र प्रसार रोखणे आणि लहान आणि हलक्या शस्त्रांचा अवैध व्यापार थांबवणे, यासह निःशस्त्रीकरणाच्या मुद्द्यांवरील वचनबद्धतेसाठी त्यांना संयुक्त राष्ट्रांचा शांतता दूत म्हणून नियुक्त करण्यात आले होते. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांना कान चित्रपट महोत्सवात मानद पाम डी’ओर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यापूर्वी बर्नार्डो बर्टोलुची, कार्लोस सौरा, मार्टिन स्कॉर्सेसी, दिलीप कुमार, क्रिझिस्टोफ झानुसी आणि वोंग कार- वाय यांसारख्या दिग्गजांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
विशेष वार्तालापाचे आयोजन…
54 व्या इफ्फीचा भाग म्हणून, राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते शैलेंद्र सिंह यांच्या विशेष इन कॉन्वेर्सेशन सत्रातही मायकेल डग्लस आणि कॅथरीन झेटा जोन्स सहभागी होणार आहेत. शैलेंद्र सिंह, भारतीय चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध असून पर्सेप्ट लिमिटेड या कंपनीचे आणि सनबर्न संगीत महोत्सवाचे ते संस्थापक आहेत. त्यांच्या ‘फिर मिलेंगे'(2004) आणि ‘कांचीवरम’ (2008) यासारख्या त्यांच्या चित्रपटांना समीक्षकांची पसंती लाभली असून त्यांची मोठ्या प्रमाणावर दखल घेतली गेली. त्यांच्या ‘कांचिवरम’ चित्रपटाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावला होता.