पालिकेचे मेट्रोला पत्र : खांबांसाठी 5 हजार 652 चौरस मीटर जागेचा वापर
पुणे – पुणे महापालिकेच्या हद्दीत मेट्रोकडून उभारण्यात येणाऱ्या खांबांच्या जागांचे मुल्यांकन पालिकेने 27 कोटी 68 लाख रुपये केले आहे. या खांबांसाठी 5 हजार 652 चौरस मीटर जागा वापरली असून त्याचे बाजारभावानुसार मुल्यांकन केल्याचे मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख राजेंद्र मुठे यांनी सांगितले.
वनाज ते सिव्हील कोर्ट या मार्गात मेट्रोचे सुमारे 352 खांब आहेत. त्यातील सुमारे 292 खांब हे रस्त्यावरून असून उर्वरित 60 खांब हे नदीपात्रातून आहेत. तर, सिव्हील कोर्ट ते रामवाडी या मार्गात 296 खांब असून हॉरीस पूल ते कृषी महाविद्यालयापर्यंत सुमारे 40 खांब आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक खांबासाठी सरासरी 9 चौरस मीटर जागा वापरली असून एकूण 628 खांब पालिका हद्दीत आहेत.
पालिकेच्या हिश्शातून रक्कम वजा करणार
मेट्रो प्रकल्पात पुणे महापालिकेचा हिस्सा 900 कोटींचा आहे. तर, आतापर्यंत पालिकेने महामेट्रोला प्रकल्पासाठी दिलेल्या जागांचे एकूण मुल्यांकन सुमारे 410 कोटी रुपयांचे असून पालिकेकडून अद्यापही अनेक जागा मेट्रोला देण्यात येणार आहेत, त्या जागांचे मुल्य या हिश्श्यातून वजा केले जाणार आहे. तर खांबांसाठीच्या जागांचे हे सुमारे 27 कोटींचे मुल्यही पालिकेच्या हिश्श्यातून वजा करण्यासाठी पत्र देण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.