सुरेश इथापे : ठेकेदाराला दुपारी 3 ते 5 भेटण्याची वेळ : महापालिकेतील ठेकेदारांचे जुने पायंडे बंद
नगर – महापालिकेची कामे ठेकेदाराने प्लॅन इस्टिमेंन्ट प्रमाणेच करायची आहे. वर्क ऑर्डर देवूनही जी कामे ठेकेदाराने अद्यापही पूर्ण केली नाहीत. त्यांना महापालिका नोटीसा बजावणार असून, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. महापालिकेच्या जिवावर ठेकेदार आहेत. ठेकेदारांच्या जिवावर महापालिका नाही. शहरातील कामे गुणवत्तापूर्ण झालीच पाहिजेत. निकृष्ट कामे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असून, महापालिकेतील ठेकेदारांचे जुने पायंडे बंद करण्याचा इशारा प्रभारी शहर अभियंता सुरेश इथापे यांनी दिला आहे.
महापालिकेत मंगळवार (दि.7) रोजी प्रभारी शहर अभियंता इथापे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. इथापे म्हणाले, की महापालिकेतील बांधकाम विभागात विनाकारण ठेकेदार गर्दी करतात. फायली घेतात. बांधकाम विभागातील हे जुने पायंडे आता चालणार नाहीत. नगर शहर आपले आहे. शहरात बांधकाम विभागाच्या ठेकेदारांविषयी प्रतिमा मलिन आहे.
ही प्रतिमा सुधारणे आवश्यक आहे. त्यासाठी सामाजिक दृष्टिकोन ठेवून काम करा. प्रस्तावाप्रमाणेच काम करा. काम निकृष्ट दर्जाचे झाल्यास बिलातील रक्कम कमी करणे, बिलाचे पैसे न देणे, ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणे आदी कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे इथापे यांनी सांगितले.
तसेच बांधकाम विभागाचे ठेकेदार महापालिकेत नेहमीच दिसतात. घोळका करून थांबतात. बांधकाम विभागात जमावाने येतात. ठेकेदारांनी बांधकाम विभागात दुपारी 3 ते 5 या वेळेतच यावे. कामाव्यतिरिक्त थांबायचे नाही, अशी सूचना प्रभारी शहर अभियंता इथापे यांनी दिल्या.
याबाबत नुकताच बांधकाम विभागाच्या ठेकेदारांसह कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी ठेकेदारांच्या व कर्मचाऱ्यांच्या अडीअडचनी समजावून घेतल्या आहेत. तीन दिवसांपूर्वीच इथापे यांनी पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी महापालिका आवारात पार्किंगची जागा दुरुस्त करणे, कार्यालयीन पद्धतीत बदल अशा सुधारणा त्यांनी सुरू केल्या आहेत.
प्रत्येक प्रभागासाठी चार अभियंत्यांची गरज
ज्या ठिकाणी 10 कर्मचाऱ्यांचे काम केवळ दोन कर्मचारी करत आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा भार मोठ्या प्रमाणात पडत असून, कामास विलंब होणे साहजीकच आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागासाठी अणखी चार अभियंते तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त करण्याची गरज व्यक्त होत आहे.