वडूज -मेकॅनिकल इंजिनिअरिंग, एमबीए अशा उच्च पदव्या घेऊन जपानच्या कंपनीत सेवा करून आठ ते दहा देशांचे दौरे करणाऱ्या अभियंता युवकाने गेल्या चार महिन्यांत लॉकडाऊनच्या काळात चक्क गावच्या शेतीत स्वत:ला झोकून दिले आहे. सौरभ संदेश सातभाई (रा. बुध, ता. खटाव) असे या युवकाचे नाव आहे.
प्रख्यात विधीज्ञ ऍड. संदेश सातभाई व विमा महामंडळाच्या येथील शाखेतील अधिकारी सौ. श्रद्धा सातभाई यांचा सौरभ हा चिरंजीव आहे. सौरभचे प्राथमिक शिक्षण वडूज येथे झाले. त्यानंतर त्याने सोलापूरमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग व पुण्यात एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. कायझेन इन्स्टिट्यूट या जपानच्या कंपनीच्या पुणे येथील कार्यालयात तो गेल्या पाच वर्षापासून सेवेत आहे.
खासगी उद्योग, व्यवसाय तसेच मोठ्या कंपनीच्या कामांत सुधारणा करणे, कंपनीच्या व्यवसायवृद्धीसाठी प्रारूप आराखडा तयार करून मार्गदर्शन करणे अशा स्वरूपाची कामे या कंपनीच्यावतीने केली जातात. कंपनीच्या या कामकाजा निमित्त गेल्या पाच वर्षांत त्याची भारतातील विविध राज्यांसह केनिया, घाना, आयव्हरी कोस्ट, थायलंड, इथिओपिया आदी काही देशांत भ्रमंती झाली. मोठे उद्योजक, कंपनीतील बड्या अधिकाऱ्यांच्या सहवासामुळे त्याचे राहणीमानदेखील पदाला साजेसेच राहिले आहे.
चार महिन्यांपूर्वी करोनाचे लॉकडाऊन होण्याच्या प्रारंभीच्या काळात तो राजस्थानमध्ये एका मोठ्या कंपनीच्या कामानिमित्त कार्यरत होता. त्यावेळी लॉकडाऊन जाहीर होताच कंपनीने सर्वांना घरी जाण्याच्या सूचना केल्या. त्यावेळी त्याने आपल्या पुणे येथील घरी न थांबता थेट बुध या मूळ गावी जाणे पसंत केले. त्यावेळी गावाकडे असलेल्या शेतीमध्ये बटाटा, ऊस, आले लागवडीबरोबरच आंबा, नारळ, जांभळ, आवळा अशा फळझाडांच्या जोपासनेकडे लक्ष दिले.
त्याने स्वत:ला शेती कामांत झोकूनही दिले. शेती कामात लक्ष देण्याबरोबरच कंपनीचे ऑनलाइन कामही तो करीत आहे. देश परदेशांतील लोकांशी तो संवाद साधत आहे. उच्चपदस्थ अभियंता युवकाच्या या शेतीत झोकून देण्याच्या वृत्तीचे नागरिकांनीही कौतुक केले. कु. सौरभ याला कंपनीकडून विविध पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. याशिवाय निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ.राजीव कुमार यांनी देखील त्याच्या कामाचे विशेष कौतुक केले आहे.