पुणे – भुसार बाजरातील व्यापाऱ्यांनी जास्तीत जास्त ऑनलाइन पेमेंट पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन दि पूना मर्चंट्स चेंबरतर्फे करण्यात आलेले आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आले आहे.
गुळ-भुसार विभागात काही व्यापाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दि. 19 मेपासून भुसार बाजार बंद ठेवण्याचा निर्णय चेंबरने घेतला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी, बाजार समिती प्रशासन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सोमवारपासून (दि.25) बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल बोलत होते.
त्यावेळी माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले, उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव विजय मुथा, सहसचिव अनिल लुंकड, जवाहरलाल बोथरा उपस्थित होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक दुकानदाराने दुकनात थर्मल गन, सॅनिटायझर, सोशल डिटन्स, प्रत्येकाने मास्क वापरणे आवश्यक असल्याच्या सूचना चेंबरतर्फे देण्यात आलेल्या आहेत.
प्रत्येकाने दुकान उघडे ठेवलीच पाहिजेत, असे बंधन नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. बाजारात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची थर्मलद्वारे तपासणी करून बाजारात प्रवेश देण्यात येणार आहे. मार्केटचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण केले जाणार आहे.