पाटण -पाटण तालुक्यात शनिवारी करोनाचा जणू स्फोटच झाला. तब्बल 20 रूग्ण करोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये कोयना, म्हावशी, ढेबेवाडी भागातील रुग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्यक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
बाधित रूग्णांच्या निकट सहवासातील 67 जणांना पाटण येथील कोव्हिड सेंटरमध्ये संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले आहे. अद्याप 52 जणांचे करोना अहवाल प्रलंबित आहेत. पाटण तालुक्यात अचानक झालेल्या करोना स्फोटाने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. शनिवारी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील शिरळ येथे 26, 25, 52 वर्षीय तीन महिला व 10 वर्षाचा मुलगा असे एकूण चार पॉझिटिव्ह, शितपवाडी येथील 40, 19, 14 वर्षीय असे एकूण तीन पॉझिटिव्ह पुरुष, भरेवाडी 36 वर्षीय पुरुष, भालेकरवाडी पुरूष, बनपुरी 40, 19, 48 वर्षीय पुरुष व 16 वर्षांचा मुलगा असे चार जण पॉझिटिव्ह तर सांगली जिल्हातील कडेगाव तालुक्यातील कोतिज येथील बनपुरीच्या बाधित रुग्णाच्या संर्पर्कात आलेली 31 वर्षीय स्त्री, 10 व 8 वर्षीय दोन मुले तीनजण पॉझिटिव्ह, गावडेवाडी 27 व 20 वर्षीय दोन पुरूष पॉझिटिव्ह अशा एकूण 19 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले.
तर सायंकाळी गलमेवाडी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये पाटण करोना केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या व्यक्तींपैकी 38 जणांचे नमुने गुरूवारी घेण्यात आले होते. त्यापैकी 15 पॉझिटिव्ह तर उर्वरित सर्व निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. अन्य तिघांनी थेट जाऊन चाचणी केल्यानंतर त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यापैकी अपवाद वगळता बहुतांशी लोक हे पाटण करोना केअर सेंटर, स्थानिक शाळा अथवा होम क्वारंटाइन होते.
त्यामुळे यातून सामूहिक संसर्गाचा धोका कमी होईल, अशा शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे. बाचोली येथील एक जण करोनाबाधित सापडला असला तरी तो गेल्या काही महिन्यांपासून कराड तालुक्यात वास्तव्यास आहे. त्याच्यावर कृष्णा हॉस्पीटल कराड येथे उपचार सुरू आहेत. त्यांच्या कुटुंबीय, नातेवाईक व संपर्कातील हाय रिस्क व्यक्तींना पाटण व तळमावले करोना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.