निवडणुकीच्या तोंडावर मनसेत अस्वस्थता

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणूकीची आता कोणत्याही क्षणी घोषण होण्याची शक्‍यता असताना दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काय भूमिका घेतात हे अद्याप गुलदस्त्यात आहे. यामुळे निवडणूकीच्या तोंडावरच मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ईडीच्या चौकशीनंतर राज ठाकरे यांची तोफ अचानक थंडाविली असल्याने निवडणूक लढायची की नाही हेच अद्याप निश्‍चित झालेले नाही.

राज ठाकरे यांच्या भूमिकेने मनसेचे नेते कार्यकर्तेही संभ्रमावस्थेत आहेत. निवडणुका तोंडावर असताना आता नेमकं करायचे तरी काय? असा प्रश्न मनसैनिकांसमोर उपस्थित झाला आहे. इतकंच नाही तर राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे मनसेत अस्वस्थता पसरली आहे.

निवडणूक लढवून उपयोग नाही, ईव्हीम सेट आहे अशी एका गटाची भूमिका आहे. तर दुसऱ्या बाजूला निवडणूक लढवण्यावर एक गट ठाम आहे. निवडणुकीत लोकांसमोर जायलाच हवे अन्यथा लोक रस्त्यावरही फिरू देणार नाहीत, अशीही भावना अनेक कार्यकर्त्यांची आहे.

त्यामुळे निवडणुकीवरुनच मनसेचे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम आहे. गुरूवारी झालेल्या मनसेच्या बैठकीत विधानसभा निवडणूक लढवायवा नको, असे काही नेत्यांचे म्हणणे होते. शिवाय स्वत: राज ठाकरे यांचा सुद्धा निवडणूक न लढवण्याकडे कल आहे. मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये राज ठाकरेबद्दल नाराजी आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर निवडणूक न लढवण्याचा निर्णय होत असेल तर मनसेचा मोठा गट वेगळा विचार करण्याची दाट शक्‍यता आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेतली खदखद बाहेर येण्याची शक्‍यता आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×