मुंबई – पंजाब नॅशनल बॅंक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता त्याची पत्नी प्रीती चोक्सीही ईडीच्या रडारवर आली आहे. बॅंक घोटाळा प्रकरणात ईडी दुसऱ्या आरोपपत्रात प्रीतीला चोक्सीला आरोपी करणार आहे. हा मेहुलसाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.
पंजाब नॅशनल बॅंकेत घोटाळा करून फरार झालेल्या मेहुलने कोट्यवधीची मालमत्ता पत्नी प्रीतीच्या नावे केली आहे. ही सर्व मालमत्ता परदेशात आहे. दुबईसह इतर ठिकाणी ही मालमत्ता आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून ही मालमत्ता विकत घेण्यात आली आहे. त्यामुळे ईडी प्रीतीवर कारवाई करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हिलिंग्डन होल्डींग्ज कंपनीत प्रीतीचा मालक्की हक्क असल्याचे आढळून आले आहे. 2013मध्ये प्रीतीने गीतांजली जेम्समध्ये काम करणाऱ्या डिओन लिलीची भेट घेतली होती. त्यानंतर सी. डी. शाह आणि असिस्टंट नेहा शिंदे यांना सोबत घेऊन प्रीतीने तीन ऑफशोर कंपन्या स्थापन केल्या होत्या. या शिवाय 2014 मध्ये कंपनीच्या अकाऊंटमधून मोठी रक्कम वर्ग करण्यात आली होती.
ज्या कंपनीला ही रक्कम देण्यात आली, ती कंपनी गीतांजली ग्रुपशी संलग्न होती. काही कागदपत्रांची चौकशी केली असता ही रक्कम प्रीतीच्या नावावर पैसे ट्रान्स्फर केल्याचे आढळून आले आहे. या कागदपत्रांवर प्रीतीची सही असल्याचेही तपासात आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली.