नागपूर – मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर आता राज्यातील महायुतीचे नेतेही पंतप्रधानांची भेट घेणार आहेत.
येत्या 20 तारखेनंतर मोदींची भेट घेणार असल्याचे रिपाई नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
नागपूर येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रामदास आठवले म्हणाले, येत्या 20 जूननंतर युतीचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. यावेळी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षण आणि वादळामुळे नुकसान झालेल्यांना भरपाई मिळावी आदी मुद्द्यांवर पंतप्रधानांशी चर्चा करण्यात येईल. तसेच क्षत्रियांना 10 टक्के आरक्षण मिळावे ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. त्याबाबतही मोदींशी चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय आणि एसी, एसटीचा पदोन्नतीतील आरक्षण हे मोठे विषय आहेत. मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारला योग्य प्रकारे भूमिका मांडता आलेली नाही. मराठा समाज राज्यकर्ता आणि श्रीमंत आहे, असे न्यायालयाला वाटले असावे. पण मराठा समाजात अनेक लोक गरीब आहेत. त्यांना आरक्षणाची गरज आहे. मात्र, त्यांना आरक्षण नाकारण्यात आले आहे. 50 टक्के आरक्षण मर्यादेच्या पुढे जाऊन आरक्षण देता येऊ शकते. हे न्यायालयाला पटवून देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच महाविकास आघाडी सरकारने पदोन्नतीतील आरक्षणाबाबत घातकी भूमिका घ्यायला नको होती. हे सरकार दलित विरोधी असून या सरकारमध्येच प्रचंड मतभेद आहेत. हे सरकार किती दिवस टीकेल हे सांगता येत नाही. प्रत्येक गोष्टीत या सरकारकडून केंद्राकडे बोट दाखविले जाते, असेही ते म्हणाले.