कोल्हापूरातील ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली

स्वाभिमानीची आंदोलनाची हाक; एफआरपीवरून कारखानदार आणि शेतकरी संघटनेत मतभेद

कोल्हापूर : साखर पट्टा समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात ऊसदरावरून सुरू झालेला संघर्ष आता पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांची बैठक फिस्कटल्यानंतर आता रस्त्यावरची लढाई तीव्र होणार आहे.

कोल्हापुरात ऊसदराबाबत कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांत सुरू असणारी बैठक आज फिस्कटली आहे. एफआरपीचे तुकडे करण्याच्या कारणावरून साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेत मतभेद झाल्याने या बैठकीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. तर 23 नोव्हेंबरला होणाऱ्या स्वाभिमानीच्या ऊस परिषदेत अंतिम निर्णय होईपर्यंत जिल्ह्यातील कोणताच साखर कारखाना सुरू करू देणार नसल्याचा गंभीर इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. तर 25 नोव्हेंबरला पुन्हा बैठकीचे आयोजन केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने सुरू झाले आहेत. अद्याप ऊस दरासंदर्भात कोणताही तोडगा निघालेला नाही. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यात सुरू असणारी ऊस वाहतूक ठिकठिकाणी बंद पडली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संघर्षाची ठिणगी पडू नये आणि या हंगामातील ऊस दराबाबत तोडगा निघावा यासाठी आज कोल्हापुराच्या शासकीय विश्रामगृहात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि कारखानदार यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीला कारखानदारांच्या वतीने आमदार सतेज पाटील, आमदार प्रकाश आवाडे हे उपस्थित होते. तर शेतकरी संघटनेच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, जिल्हाध्यक्ष सावकर मादनाईक यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.